ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशात यावर्षी सुमारे ५०० नव्या नोंदी करण्यात आल्या असून त्यात ‘अरे यार’, ‘चुडीदार’, ‘भेलपुरी’ आणि ‘ढाबा’ हे हिंदी शब्दही त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.
ऑक्सफर्ड शब्दकोशात नव्याने समावेश केलेल्या ‘कीमा’ आणि ‘पापड’ यांसह सुमारे २४० भारतीय शब्द आहेत. ‘चुडीदार’ या शब्दाची व्याख्या ‘पायाच्या तळाशी जादा कापडासह तयार केलेल्या घट्ट ट्राऊजर्स’ अशी केली असून, या कापडाच्या घोटय़ाजवळ घडय़ा होतात आणि दक्षिण आशियातील लोकांचा हा पारंपरिक पोषाख आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
‘ढाबा’ शब्दाची व्याख्या ‘भारतात, किंवा भारतीय संदर्भात, रस्त्याशेजारचा फूड स्टॉल किंवा उपाहारगृह’ अशी करण्यात आली आहे. ‘यार’ शब्दाचा अर्थ ‘एखाद्या मित्राला किंवा साथीदाराला संबोधित करण्याचा परिचित प्रकार’ असा देण्यात आला आहे. ‘भारतीय पाककला : फुगलेला भात, कांदे, बटाटे, मसालेदार व गोड चटण्या यांनी भरलेला पदार्थ, जो कधी कधी पुरीवर टाकून देण्यात येतो’, हे भारतीयांना काहीसे चमत्कारिक वाटणारे वर्णन ‘भेळपुरी’चे करण्यात आले आहे. काही इंग्रजी शब्द मुळात संस्कृतमधून घेण्यात आले आहेत, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. ‘कर्म’, ‘लूट’, ‘बंधन’ हे इंग्रजीमध्ये वापरले जाणारे काही संस्कृत शब्द आहेत.