पहिल्यांदा ‘सूट बूट की सरकार’, नंतर ‘फेअर अँड लव्हली’ आणि आता ‘अरहर मोदी.. ‘महागाईच्या मुद्दय़ावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत आणखी एक लक्षवेधक शब्दफेक केली.. ‘अरहर मोदी’! २०१४मध्ये मोदी लोकसभा निवडणूक लढवित असताना ‘हर हर मोदी’, ‘घर घर मोदी’ या घोषणांनी वाराणसी दुमदुमून गेली होती. त्याच लोकप्रिय घोषणेचा नेमका आणि चपखल वापर करून मोदींना घायाळ करण्याचा प्रय राहुल यांनी केला. अरहर म्हणजे आपली तूरडाळ. हिंदी पट्टय़ामध्ये सर्वाधिक सेवन केल्या जाणारया या अरहर डाळीचा बाजारातील भाव दीडशे रूपयांपासून ते दोनशे रूपयांदरम्यान गेल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

डाळींच्या भरमसाठ वाढलेल्या भावांचा उल्लेख करीत राहुल म्हणाले, ‘मोदीजी, तुमच्या राजवटीमध्ये डाळींचे भाव १२० टक्कय़ांनी कडाडले आहेत. त्यामुळे गावागावांतील जनतेमध्ये एक घोषणा दिली जात आहे.. ‘अरहर मोदी’, ‘अरहर मोदी’, ‘अरहर मोदी’..! एकही रोजगार दिला असतानाही तुम्ही ‘मेक इन इंडिया’ची जाहिरातबाजी करू शकता.. पण डाळींच्या महागाईवरून जनतेला मुर्ख बनवू शकत नाही. डाळींचे आणि भाज्यांचे भाव कधी कमी होतील, याची स्पष्ट तारीख तुम्हाला द्यवीच लागेल.