भारतीय लष्कराच्या कॅन्टिन विभागाने पतंजलीचा आवळा ज्युस विकण्यास नकार दिला आहे. प्रयोगशाळेतील चाचणीत पतंजलीच्या आयुर्वेदिक आवळा ज्युसमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे लष्कराच्या कॅन्टिनकडून पतंजली आवळा ज्युसची विक्री न करण्याचा निर्णय घेतला. मात्र पतंजलीने आवळा ज्युसमध्ये आयुर्वेदिक घटक असून ते शरीरासाठी अतिशय योग्य असल्याचे म्हटले आहे.

लष्कराच्या कॅन्टिनमध्ये पतंजली आवळा ज्युसची चाचणी घेण्यात आल्यावर त्यात काही त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे पतंजलीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. कोलकात्यामधील पश्चिम बंगाल सार्वजनिक विभागाच्या लॅबमध्ये पतंजली आवळा ज्युसची तपासणी करण्यात आली होती.

कॅन्टिन स्टोर्स डिपार्टमेंटने (सीएसडी) पतंजलीच्या संबंधित (त्रुटी आढळलेल्या) बॅचची विक्री थांबवली आहे. या प्रकरणी लष्करी कॅन्टिनने त्रुटी आढळलेला आवळा ज्युस पतंजलीला परत पाठवला आहे. यासोबतच ‘पतंजलीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याची सूचनादेखील करण्यात आली आहे,’ अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. पतंजलीने स्पष्टीकरण दिल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

कॅन्टिन स्टोर्स डिपार्टमेंटने पतंजलीच्या इंडेक्स नंबर ८५४१७ आणि बॅच नंबर जीएच१५०२ मधील आवळा ज्युसची कोलकात्यामधील लॅबमध्ये चाचणी केली. यावर भाष्य करताना, ‘आवळा ज्युस आयुर्वेदिक औषध असून त्याची चाचणी आयुष मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या निर्देशांनुसारच करण्यात यावी,’ असे पतंजलीने म्हटले आहे. यासोबतच ‘फूड सेफ्टी अॅण्ड स्टँडर्ड्सचे निर्देश ज्युसला लागू होत नाहीत,’ असेही पतंजलीकडून सांगण्यात आले आहे. लष्कराच्या कॅन्टिन स्टोर्स डिपार्टमेंटकडून ठराविक कालावधीनंतर विक्री करण्यात येणाऱ्या पदार्थांची देशभरातील शासकीय लॅब्समध्ये चाचणी केली जाते.