बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेतून एका आठवडय़ापूर्वी बेपत्ता झालेले लष्करातील कॅप्टन शिखरदीपसिंग शनिवारी उत्तर प्रदेशातील फैजाबाद पोलिसांसमोर अचानक हजर झाले.
आपण शिखरदीपसिंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे, ते फैजाबाद जिल्ह्य़ातील कोतवाली पोलीस ठाण्यात असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांना फैजाबादमधील डोग्रा कॅण्टोनमेण्ट येथे नेले आहे, असे रेल्वे पोलीस अधीक्षक जितेंद्रकुमार मिश्रा यांनी सांगितले.
शिखरदीपसिंग यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या बहिणीला दूरध्वनी करून आपण कोतवाली पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले. ही माहिती त्यांच्या बहिणीने वडील लेफ्ट. कर्नल अनंतकुमार यांना दिली. त्यानंतर वडिलांनी रेल्वे पोलिसांना कॅप्टन शिखरदीपसिंग फैजाबादला असल्याचे कळविले.