काश्मिरी व्यक्तीचा मानवी ढाल म्हणून वापर करणाऱ्या मेजर गोगोई यांचा करण्यात आलेला सन्मान योग्यच असल्याचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले आहे. मेजर गोगोई काश्मीर खोऱ्यात अतिशय प्रतिकूल स्थितीत काम करत असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पुरस्कार देण्यात आल्याचे रावत यांनी म्हटले. यासोबतच मेजर गोगोईंविरोधात कारवाई करण्याची गरज नसल्याचेदेखील लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केले.

मेजर नितीन गोगोई यांनी दगडफेक करणाऱ्या जमावापासून बचाव करण्यासाठी एका व्यक्तीला लष्कराच्या जीपसमोर बांधले होते. मेजर गोगोई यांच्या या निर्णयाचे लष्कर प्रमुखांनी कौतुक केले आहे. ‘गोगोई यांना देण्यात आलेल्या सन्मानामुळे सुरक्षा दलांचा आत्मविश्वास उंचावेल,’ असे बिपीन रावत यांनी म्हटल्याचे वृत्त ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिले आहे. ‘काश्मीर खोऱ्यातील हिंसेच्या घटनांना आळा घालून शांतता प्रस्थापित करणे, ही सैन्याची जबाबदारी आहे. याचसाठी मेजर गोगोई यांनी काश्मिरी व्यक्तीला जीपसमोर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, त्यांचा हा निर्णय अतिशय योग्य होता. याचसाठी गोगोई यांचा सन्मान करण्यात आला आहे. यामुळे जवानांचे मनोधैर्य उंचावेल आणि ते परिस्थिती हाताबाहेर जाऊ देणार नाहीत,’ असे लष्कर प्रमुखांनी म्हटले.

मेजर गोगोई यांना वीरता पुरस्कार देण्यात येणार का, या प्रश्नावर बोलताना ‘वीरता पुरस्कार एका प्रक्रियेनंतर सामान्यत: १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला दिला जातो. मात्र यासारख्या घटनानंतर लगेच सन्मान देण्याची आवश्यकता असते,’ असे लष्कर प्रमुख बिपीन रावत म्हणाले. मेजर गोगोई यांच्याविरोधात लष्करी न्यायालयाची चौकशी सुरु आहे, याबद्दलदेखील रावत यांना विचारण्यात आले. ‘न्यायालयीन चौकशीनंतर गोगोई दोषी होते की नाही, हे समजेल. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सध्या सुरु आहे. मात्र माझ्या माहितीनुसार, यामध्ये गोगोई यांची कोणतीही चूक नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाईची आवश्यकता नाही,’ असे बिपीन रावत यांनी म्हटले. ‘गोगोई यांच्याविरोधातील चौकशीत काही आढळून आल्यास, त्यांच्यावर फार मोठी कारवाई केली जाणार नाही,’ असे म्हणत रावत यांनी लष्कर गोगोई यांच्या पाठिशी असल्याचे संकेत दिले.