जागतिक महासत्तेची स्वप्ने पाहणारा भारत आणि महासत्तापदाकडे वाटचाल करणारा चीन या दोन्ही देशांच्या लष्करप्रमुखांमध्ये गुरुवारी भेट झाली. उभय देशांच्या सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करणे, सीमा सुरक्षेची नवी यंत्रणा कार्यान्वित करणे, सागरी सहकार्य अशा अनेक मुद्दय़ांवर या भेटीत चर्चा करण्यात आली. भारत आणि चीन ही एकमेकांची शत्रुराष्ट्रे नसून त्यांनी मित्रत्वाच्या भावनेने एकमेकांकडे पाहावयास हवे, अशी अपेक्षा या भेटीत व्यक्त करण्यात आली.
भारतीय लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग हे गेल्या नऊ वर्षांत चीनच्या भेटीस जाणारे पहिले भारतीय लष्करप्रमुख आहेत. या दौऱ्यात जनरल सिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे प्रमुख फँग फेंगहुई यांची भेट घेतली. उभय देशांच्या लष्करांमधील वाढते सहकार्य, गतवर्षी करण्यात आलेल्या सीमा संरक्षण सहकार्य करारातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी, उभय देशांच्या सैन्यांमधील वाढती देवाणघेवाण आदी मुद्दय़ांवर या भेटीमध्ये चर्चा झाली.
दरम्यान, जनरल बिक्रम सिंग यांनी चीनच्या लष्करी आयोगाचे प्रमुख जनरल फॅन चँगलाँग आणि चीनचे उपराष्ट्रपती ली युआनचाओ यांचीही भेट घेतली.
चीनकडून समाधान
नव्या सरकारच्या स्थापनेनंतर भारतातर्फे लष्करप्रमुखांनी चीनच्या दौऱ्यावर येणे यातून भारत चीनला किती महत्त्व देतो हे अधोरेखित होते आणि आम्ही याबद्दल समाधानी आहोत, अशा शब्दांत चीनच्या लष्करप्रमुखांनी भारतीय लष्करप्रमुखांचे स्वागत केले.
विशेष सहकार्य वर्ष
चालू वर्ष हे भारत आणि चीन यांच्यातील ‘मैत्रीपूर्ण देवाणघेवाणी’चे वर्ष आहे. या पाश्र्वभूमीवर सागरी सुरक्षा, जागतिक सुरक्षा व्यवस्था, दहशतवादविरोधी सहकार्य, सीमावर्ती भागातील शांतता आदी बाबींसाठी काय काय करता येऊ शकेल, यावर दोन्ही देशांच्या लष्करप्रमुखांनी चर्चा केली. तसेच लवकरच भारतात उभय देशांच्या सैन्यात चौथ्या दहशतवादविरोधी कसरतींचे आयोजन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.