पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराने जमीन बळकवल्यामुळे स्थानिक लोकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली येथे लष्कराने जमीन बळकवल्यानंतर लोकांनी निदर्शने केली आहेत. त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले असून पाकिस्तानविरोधी घोषणा देत आहेत. नवाज शरीफ यांच्या प्रशासनाविरोधात स्थानिक लोकांनी आपली तीव्र नाराजी जाहीर केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी लष्कराविरोधात आणि नवाज शरीफ यांच्या विरोधात नारेबाजी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील वेगवेगळ्या प्रांतामध्ये लोकांनी सरकार विरोधात निदर्शने केली आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवी अधिकारांच्या उल्लंघनाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

पाकिस्तानच्या लष्कराने तेथील जनतेवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. जुलै २०१६ पासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारविरोधात शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली आहेत. जुलै महिन्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाने ४१ पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. शरीफ यांनी निवडणुकीचा बनाव केला होता असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या निवडणुकांचे निकाल आधीच निश्चित करण्यात आले होते असे देखील स्थानिकांचे म्हणणे होते. तेव्हापासून आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधात नाराजीचा सूर आहे. या निवडणुकांवेळी आम्हाला मतदानाला सुद्धा जाऊ देण्यात आले नव्हते असे आंदोलकांनी म्हटले होते. निवडणूक जिंकता यावी यासाठी शरीफ यांना लष्कर आणि इंटर सर्व्हिसेस इंटिलिजन्स (आयएसआय) ने मदत केली होती असा आरोप पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी केला आहे.