काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्य़ातील केरण क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून (एलओसी) रविवारी मध्यरात्री होणारा घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले.
केरण क्षेत्रातील नियंत्रण रेषेवर असलेल्या कुंपणाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास काही जणांच्या संशयास्पद हालचाली भारतीय जवानांनी टिपल्या. त्यांनी घुसखोरांना आव्हान दिले असता पलीकडून गोळीबार सुरू झाला. दोन्ही बाजूंनी सुमारे दोन तास गोळीबार सुरू राहिला. सकाळी हाती घेतलेल्या शोधमोहिमेत तीन मृतदेह आढळून आले.
हे दहशतवादी एलओसीवर उभारलेले कुंपण कापत असताना जवानांनी नाइट व्हिजन उपकरणांतून त्यांच्या हालचालींची नोंद केली. सैन्याने घटनास्थळावरून तीन एके-४७ रायफली, १२ काडतुसे, २ यूबीजीएल ग्रेनेड्स आणि इतर शस्त्रसाहित्य जप्त केल्याचेही हा अधिकारी म्हणाला.
काश्मीरच्या उंच पर्वतीय भागातील बर्फ वितळण्यास सुरुवात झाल्यानंतर गेल्या काही आठवडय़ात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली आहे.