जम्मू काश्मीरमधील लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आल्यानंतर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. लडाखमधील घुसखोरीमुळे वातावरण तापल्याने बुधवारी चीनने दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी सकाळी चिनी सैन्याने लडाखमध्ये दोनदा घुसखोरी केली. यावेळी भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर आले. यावेळी दोन्ही बाजूंनी दगडफेक झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने येऊन एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना पहिल्यांदाच घडली. या घटनेमुळे सीमेवरील तणावात वाढ झाल्यानंतर आता दोन्ही देशांच्या लष्कराचे अधिकारी लेहच्या चुशूलमध्ये बैठक घेणार आहेत. लडाखमधील भारत-चीन सीमेवर शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी या बैठकीमध्ये चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी चीनच्या सैन्याने फिंगर फोर आणि फिंगर फाईव्हमध्ये घुसखोरी केली. सकाळी ६ ते ९ या कालावधीत चिनी सैन्य दोनवेळा भारतीय हद्दीत घुसले. मात्र भारतीय सैन्याने चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले.

लडाखमधील फिंगर फोरवर चीनने अनेकदा दावा सांगितला आहे. मंगळवारी चिनी सैन्य या भागात घुसखोरी करण्यात यशस्वी झाले होते. मात्र भारतीय जवानांनी त्यांना मागे रेटले. भारतीय जवानांनी मानवी साखळी करत चिनी सैन्याला रोखून धरले. यावेळी चिनी सैन्याकडून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे भारतीय सैन्यानेदेखील प्रत्युत्तर देत दगडफेक सुरु केली. यामध्ये दोन्ही बाजूचे काही जवान किरकोळ जखमी झाले. याबद्दल चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना विचारले असता, घुसखोरीबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.

सिक्कीमजवळील डोकलाम येथील वर्चस्वाच्या मुद्दय़ावरून गेला महिनाभर भारत व चीनमध्ये वाद सुरू असतानाच आता चीनने लडाख सीमेवरही भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. लडाखमधील पँगाँग सरोवराचा ४५ किमी लांबीचा भाग भारतात तर ९० किमी लांबीचा भाग चीनच्या ताब्यात आहे.