पठाणकोट येथील हवाईतळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हल्ल्याचा धोका असलेल्या किंवा दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरू शकणाऱ्या लष्करी, निमलष्करी व पोलीस दले यांच्या सर्व आस्थापनांची विशिष्ट कालमर्यादेत सुरक्षा तपासणी केली जाईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले. पठाणकोट हल्ल्यानंतर उच्चस्तरीय बैठकीत सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला, त्या वेळी गृहमंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लादार अजित डोव्हल तसेच सुरक्षा व गुप्तचर खात्याचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. दरम्यान, प्रजासत्ताकदिनी असलेला हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

२ जानेवारीला पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. सीमेपलीकडून हल्ल्यांचा धोका कायम असल्याने गुप्तचर खात्यात तांत्रिक पातळीवर अधिक सुधारणा करण्याची गरज आहे. शिवाय हल्ल्यांबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचीही गरज आहे. पठाणकोटसारख्या हल्ल्यांचा प्रतिबंध, वेळीच गुप्तचर सूचना व हल्ल्यांचे कट हाणून पाडणे यावर चर्चा झाली. तासभर चाललेल्या बैठकीत असे सांगण्यात आले, की एकदा गुप्तचरांकडून ठोस सूचना मिळाली, की वेळ न घालवता त्यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे व निर्णयप्रक्रियाही वेगवान होणे गरजेचे आहे. आताच्या हल्ल्याच्या वेळी सुरक्षा संस्थांनी जो समन्वय दाखवला तो कौतुकास्पद असून, त्यात आणखी वाढ करण्याची गरज आहे. गुप्तचर संस्थांनी या वेळी हल्ल्याची पूर्वसूचना सुरक्षा संस्थांना दिली होती, त्यामुळे हानी कमी झाली या बाबींचीही प्रशंसा करण्यात आली. जवानांनी जे धैर्य व शौर्य दाखवले त्याबाबत कौतुक करतानाच हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माध्यमांशी संवादासाठी धोरण असले पाहिजे व अशा प्रसंगात अधिकृत व्यक्तींनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली पाहिजे व त्यासाठी संबंधित व्यक्तींना माध्यमांशी संपर्काचे प्रशिक्षणही दिले गेले पाहिजे, असे मत व्यक्त करण्यात आले. अलीकडे गुप्तचरांनी दिलेल्या सूचनांचे विश्लेषण करण्यात आले असून अंतर्गत सुरक्षेचा आढावाही घेण्यात आला आहे. प्रजासत्ताकदिनाच्या सुरक्षेची दक्षता घेण्यात आली असून या वेळी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकाईस ऑलांद हे प्रमुख पाहुणे आहेत. दिल्लीत महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीत निमलष्करी दलाचे १० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा वाढवली आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा लांबणीवर टाकण्यात आल्यानंतर आज ही बैठक झाली असून त्या वेळी गृहसचिव राजीव महर्षी, संरक्षण सचिव जी. मोहन कुमार तसेच विविध सुरक्षा दलांचे अधिकारी उपस्थित होते.

नेमके किती अतिरेकी घुसले..

अलीकडच्या गुप्तचर माहितीनुसार जैश ए महंमदचे ६ ते १० दहशतवादी पंजाब मार्गे भारतात घुसले असावेत. तीन दिवसांच्या चकमकीत पठाणकोट येथे जैश ए महंमदचे सहा संशयित दहशतवादी मारले गेले व बाकीचे दहशतवादी फरारी आहेत. पंजाब पोलिसांच्या मते आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून किमान पंधरा दहशतवादी आले असून, त्यांच्यापासून सुरक्षेला धोका आहे.