लष्कराच्या भरतीचे पेपर फुटल्याने देशभरातील लष्कराची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. देशभरात आज (रविवारी) लष्कर भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार होती. मात्र पेपर फुटल्यामुळे लष्कर भरतीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नागपूर, अहमदाबाद, गोवा, किर्की आणि इतर ठिकाणी होणारी लष्कर भरती परीक्षा रद्द झाल्याचे लष्करातील सूत्रांनी सांगितले आहे. क्लर्क, स्ट्राँगमन, ट्रेड्समन या पदांसाठी देशभरातील ५२ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार होती. मात्र ही पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

काल (शनिवारी) संध्याकाळी रविवारी लष्कर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे पेपर फुटल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा महाराष्ट्र आणि गोव्यात छापेमारी केली. यामध्ये पोलिसांनी १८ आरोपींसह तब्बल ३५० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. लष्करी भरतीचे कोचिंग क्लास चालवणाऱ्या काही मंडळींनी परीक्षेआधीच विद्यार्थ्यांना पेपर दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही विद्यार्थ्यांना हॉटेल आणि लॉजमध्ये पेपर लिहित असताना ताब्यात घेतल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे. या सर्व प्रकरणाशी लष्करी अधिकाऱ्यांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आज सकाळी ९ वाजता लष्कराच्या भरतीसाठी देशभरात परीक्षा होणार होती. त्यामुळे पेपर फुटीचे रॅकेट चालवणारे कालच विद्यार्थ्यांकडून पेपर लिहून घेत होते. याची कुणकुण लागताच ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करत ठाणे, नाशिक, पुणे, नागपूरसह गोव्यात छापेमारी करत तब्बल ३६८ जणांना ताब्यात घेतली. या सर्व प्रकरणात बड्या लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना याबद्दल कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी २ लाख रुपये देऊन पेपर विकत घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लष्कराच्या मुख्यालयाने या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.