भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने त्यांच्या घरात घुसून खात्मा केला. भारतीय लष्कराच्या विशेष पथकाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बुधवारी रात्री १२.३० ते ४.३० यावेळेत लष्कराने ही कारवाई केली. या चार तासांच्या कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानमधील सहा ते आठ दहशतवादी तळ उदध्वस्त केले. कारवाईमध्ये ३८ दहशतवादी ठार करण्यात आले.

अशी केली कारवाई
* काश्मीरमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती.
* या माहितीच्या आधारावर लष्कराने नियोजनबद्धपणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
* दहशतवादी आपल्या जमिनीवर येण्याअगोदरच त्यांना रोखण्यासाठी लष्कराकडून ‘सर्जिकल स्ट्राईक’चे नियोजन करण्यात आले.

* लष्काराचं विशेष पथक बुधवारी रात्री १२.३० वाजता हेलिकॉप्टरने पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले.
* हेलिकॉफ्टरमधून उतरल्यानंतर जवानांनी ५०० मीटर ते २ किलोमीटर परिसरात दहशतवादी तळांवर कारवाई केली.
* पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत असणाऱ्या भीमबेर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा सेक्टरमध्ये जवानांनी हे ऑपरेशन केल्याची माहिती मिळते आहे.
* भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचे सहा ते आठ तळ उदध्वस्त करण्यात आले असल्याचे समजते.
* भारतीय लष्कराने केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ३८ दहशतवादी ठार झाले आणि अनेक जखमी झाले आहेत.
* आता हे ऑपरेशन संपले असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.