दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमांमध्ये शक्यतो आपले सैनिक मृत्युमुखी पडू नयेत हे निश्चित करण्याबाबत आपण लष्कराला सूचना दिल्या असून, लष्कर यासंदर्भात आवश्यक ती खबरदारी घेत असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले.
जम्मू- काश्मीरमध्ये २७ जानेवारीला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले कर्नल एम.एन. राय यांच्या कुटुंबीयांना भेटून संरक्षणमंत्र्यांनी त्यांना संपूर्ण मदत देण्याचे वैयक्तिक आश्वासन दिले. कर्नल राय हे शूर अधिकारी होते, अशा शब्दांत पर्रिकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
जोवर शक्य आहे, तोवर तुमच्या बाजूची एकही व्यक्ती तुम्ही गमावू नका, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मी लष्कराला सूचना दिल्या असून, लष्कराने गेल्या दोन महिन्यांत याबाबत योग्य ती काळजी घेतली आहे, असे पर्रिकर म्हणाले. मी राय यांच्या कुटुंबाची भेट घेतली असून, त्यांना आवश्यक ती सर्व मदत ताबडतोब पुरवण्याचे वैयक्तिकरीत्या निर्देश दिले आहेत. काही अडचण आल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, असेही सांगितले असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
प्रजासत्ताक दिनी ‘युद्ध सेवा पदक’ जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, २७ जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या त्राल भागात दहशतवाद्यांशी लढताना ३९ वर्षांचे राय शहीद झाले होते.