पाकिस्तान सरकार उलथून टाकण्याची मागणी करण्यासाठी हजारो समर्थकांच्या निदर्शनाचे नेतृत्व करणारे धर्मगुरू ताहीर अल काद्री यांच्याविरुद्ध पोलिसांनी येथे गुन्हा नोंदविल्यानंतर त्यांच्या अटकेचे वॉरण्ट जारी करण्यात आले आहे.
इस्लामाबाद येथे निदर्शनांच्या ठिकाणी असलेल्या कोहसर पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याप्रकरणी काद्री आणि अन्य ७० अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. स्थानिक दंडाधिकाऱ्यांनी काद्री यांच्या अटकेचे वॉरण्ट काढल्याचे सूत्रांनी सांगितले.
काद्री यांना अटक करण्यासाठी अंतर्गत मंत्री रेहमान मलिक यांच्याकडून हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा अधिकारी करीत आहेत. काद्री यांच्याशी चर्चा करावी की त्यांना अटक करावी, अशा द्विधा मन:स्थितीत सध्या सरकार आहे, असेही सूत्रांनी सांगितले. तथापि, याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
खुनाचा प्रयत्न, सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करणे आणि पोलिसांकडून शस्त्रे खेचून शांततेता भंग करणे या संदर्भात कायद्यात असलेल्या तरतुदींच्या आधारे काद्री यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. काद्री यांना मोकळे रान मिळण्यास मदत केल्याचा आरोप सत्तारूढ पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पीएमएल-एन हा प्रमुख विरोधी पक्ष एकमेकांवर करीत आहे.
पंजाब सरकारने काद्री यांना लाहोरमधील त्यांच्या निवासस्थानीच अटक का केली नाही, काद्री यांच्या तेहरिक-मिनहाज-उल-कुराण या पक्षाकडे दुसऱ्या फळीतील नेतृत्वच नाही हे सर्वश्रुत नाही आहे का, असा सवालही विचारला जात आहे.
काद्री यांना नजरकैदेत ठेवले असते तर त्यांचे शेकडो समर्थकच रस्त्यावर उतरले असते. मात्र सत्तारूढ पक्षाला मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलावयाच्या आहेत, असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. मात्र विरोधी पक्षाने सत्तारूढ पक्षावर विश्वास ठेवला असता आणि काद्री यांना रोखण्यासाठी संयुक्त पावले उचलली असती तर त्यांना थोपविता आले असते, असे सत्तारूढ पक्षाने म्हटले आहे.