‘इसिस’च्या वाटेवरून स्वत:हून परतलेल्या आरिफ माजीदला शनिवारी आठ दिवसांची कोठडी सुनाविण्यात आली आहे. आरिफ माजीद शुक्रवारी भारतात परतल्यानंतर एनआयए आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून त्याची कसून चौकशी करण्यात आली होती. प्राथमिक तपासात आरिफवर ‘धर्मवेडा’चे संस्कार करण्यात आल्याचे उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले होते. त्यानंतर आज त्याला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने माजीदला आठ दिवसांसाठी एनआयएच्या ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आरिफ आणि कल्याणमध्ये राहणारे आणखी तीन तरुण २३ मे रोजी धार्मिक यात्रेसाठी इराकला गेले होते. त्यांच्यासोबतचे अन्य यात्रेकरू भारतात परतल्यानंतर त्यांनी या चार तरुणांबद्दल अधिक माहिती दिली. हे चौघे बगदादच्या पश्चिमेकडील फालुजाह येथून टॅक्सी करून कुठेतरी निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर हे चारही तरुण ‘इसिस’मध्ये सहभागी झाल्याचे वृत्त आले. ऑगस्टमध्ये यापैकी एका तरुणाने आरिफच्या घरी दूरध्वनी करून तो ‘शहीद’ झाल्याचे कळवल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या उत्तरक्रियेचे धार्मिक विधीही केले. मात्र, त्यानंतर आरिफनेच दूरध्वनी करून आपण जिवंत असल्याचे व ‘इसिस’च्या तावडीतून सुटल्याचे कळवले. तेव्हापासून त्याला भारतात आणण्याच्या हालचाली सुरू होत्या. अखेर शुक्रवारी तो मुंबईत परतला होता.