भारतीय जनमानसासाठी आदर्श ठरलेले व्यक्तिमत्त्व , मुलांचे लाडके, भारताचे अकरावे राष्ट्रपती, मिसाईल मॅन अवुल पकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांच्या जाण्याने सारा देशच पोरका झाला आहे.  देशाच्या भावी युवापिढीच्या सान्निध्यात असताना आयआयएम शिलाँगच्या कार्यक्रमात अचानक कोसळून नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी  त्यांचा जन्म तामिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला. त्यांचे वडील मच्छिमार नौका चालवण्याचा व्यवसाय करीत होते. वडिलांना आर्थिक मदतीसाठी ते वयाच्या आठव्या वर्षांपासून घरोघरी वर्तमानपत्र टाकत होते. शालेय शिक्षणात त्यांची कामगिरी चमकदार नव्हती पण गणितामुळे ते फार पुढे गेले. अलीकडेच त्यांनी त्यांच्या शिक्षकांची भेट घेतली होती. त्यांना एमआयटी या संस्थेत शिक्षण घेणे अवघड होते तेव्हा त्यांच्या बहिणीने सोन्याच्या बांगडय़ा गहाण ठेवून पैसे दिले होते. अगदी गरीब कुटुंबात जन्म होऊनही त्यांनी देशातील एक प्रसिद्ध वैज्ञानिक व लोकप्रिय आदर्श व्यक्ती म्हणून लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले हीच त्यांची खरी श्रीमंती होती. राष्ट्रपतिपदावर असताना लोकांचे राष्ट्रपती हे आदराचे स्थान त्यांना प्राप्त झाले. तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ महाविद्यालयातून ते पदवीधर झाले. हवाई अभियांत्रिकी विषयात मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत त्यांनी अध्ययन केले. एमआयटी या प्रख्यात संस्थेतून पदवीही त्यांनी घेतली होती. सुरुवातीच्या काळात भारतीय अवकाश कार्यक्रमाचे अध्वर्यू विक्रम साराभाई यांचा सहवास त्यांना लाभला होता. नंतर जुलै १९८० मध्ये एसएलव्ही ३ हा प्रक्षेपक तयार करणाऱ्या प्रकल्पाचे ते संचालक होते. त्यांच्या परिश्रमातून देश उपग्रह सोडू शकणाऱ्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला. इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपक कार्यक्रमात त्यांनी पायाभूत कामगिरी केली होती. दोन वर्षे इस्रोत काम केल्यानंतर ते एकात्मिक क्षेपणास्त्र विकासाची धुरा सांभाळण्यासाठी संरक्षण संशोधन व विकास संस्थेत आले. तेथे असताना त्यांनी अग्नी व पृथ्वी या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत मोठी भूमिका पार पाडली. जुलै १९९२ ते डिसेंबर १९९९ दरम्यान ते संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यावेळी अणुऊर्जा विभागाच्या मदतीने १९९८ मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात पोखरण-२ अणुचाचण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. पहिल्या पोखरण -१ अणुचाचण्यांच्या वेळीही अणुशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांनी त्यांना बोलावून घेतले होते. विज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी त्यांनी एलसीए हे हलके लढाऊ विमान तयार करण्याचा प्रकल्पही पुढे नेला. त्यांचा ब्रेनड्रेनला विरोध होता. ते भारतात घडले व त्यांनी भारताला मोठे करण्याचा ध्यास घेतला होता. मेड इन इंडियाचा आग्रह त्यांनी प्रथम धरला होता. नवीन कल्पनांचे त्यांनी नेहमी स्वागत केले व युवा पिढीला सतत प्रेरणा दिली. भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी व्हिजन २०२० कार्यक्रम मांडला होता. चेन्नई येथील अण्णा विद्यापीठात त्यांनी २००१ पासून अध्यापन केले. त्यांची विंग्ज ऑफ फायर, इंडिया २०२०-अ व्हिजन फॉर न्यू मिलेनियम, माय जर्नी, इग्नायटेड माइंड्स ही पुस्तके लहान मुले व तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली. भारत एक महाशक्ती बनेल असे स्वप्न त्यांनी पाहिले व त्यासाठी काय करता येईल याचे विवेचन इंडिया २०२० या पुस्तकातून केले.  मुलांशी त्यांचे सूर चांगले जुळत असत व त्यांच्याशी संवाद साधताना ते त्यांच्याइतके लहान होत असत. एनव्हिजनिंग एम्पॉवर्ड नेशन, डेव्हलपमेंट्स इन फ्लुईड मेकॅनिक्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी, द ल्युमिनस स्पार्कस, द लाईफ ट्री, मिशन इंडिया, चिल्ड्रेन आस्क कलाम, गायिडग सोल्स, इनडॉमिटेबल स्पिरिट अँड इनस्पायरिंग थॉट्स ही पुस्तके त्यांनी लिहिली. वैज्ञानिक म्हणून त्यांना ३० विद्यापीठांच्या डॉक्टरेट मिळाल्या होत्या. पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण( १९९०) व भारतरत्न (१९९७) हे मानाचे पद्म सन्मान तसेच रामानुजन पुरस्कार, हुवर मेडल, इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता हे पुरस्कार त्यांना लाभले. के. आर. नारायण यांच्या नंतर ते २००२ ते २००७ या काळात ते देशाचे अकरावे राष्ट्रपती होते. त्यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत लक्ष्मी सेहगल यांचा पराभव केला होता, ती लढत एकतर्फी होती. एक वैज्ञानिक देशाचा राष्ट्रपती बनण्याची ती पहिली वेळ होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी सुचवले. सर्व राजकीय पक्षांचे समर्थन त्यांना मिळाले होते. राष्ट्रपती असताना त्यांनी फाशीच्या २१ पैकी २० आरोपींच्या दयेच्या याचिकांवर निर्णय घेतला नव्हता त्यामुळे टीका झाली होती. संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरूच्या फाशीवरील दयेच्या याचिकेवरही त्यांनी उशीर केला. बिहारमध्ये २००५ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयास त्यांनी परदेशात असताना मान्यता दिली त्यावर टीका झाली होती. लाभाचे पद विधेयकावर त्यांनी शिक्कामोर्तब करण्यास नकार देऊन राष्ट्रपती म्हणजे रबरी शिक्का नाही हेही दाखवून दिले होते.
लोकांसाठी उपयोगी पडेल असे संशोधन झाले पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यामुळेच १९९८ मध्ये हृदयविकारतज्ज्ञ डॉ. सोमा राजू यांच्या समवेत त्यांनी कमी किमतीचा स्टेंट तयार केला, त्याला कलाम-राजू स्टेंट असे नाव देण्यात आले. नंतर २०१२ मध्ये याच दोघांनी आरोग्याच्या काळजीसाठी कलाम-राजू टॅबलेट तयार केला. धातुसंमिश्रे वापरून जयपूर फूटचे वजन कमी करण्यातही त्यांचा वाटा होता, त्यांना संगीताची खूप आवड होती. सरस्वती प्रसन्न असलेले कलाम हे उत्तम वीणावादक होते. त्यांना कर्नाटकी संगीतात विशेष रस होता. त्यांच्या नासा भेटीतही त्यांना स्वदेशच दिसत होता. तेथील भिंतीवर टिपू सुलतान व ब्रिटिश यांच्या सैन्याचे लढतानाचे चित्र त्यांच्या दृष्टीस पडले त्याची आठवण त्यांनी लिहिली आहे. या युद्धात टिपूच्या सैन्याने इंग्रजांविरुद्ध बाबूंच्या नळकाडय़ांपासून बनवलेले प्राथमिक अवस्थेतील अग्निबाण वापरले होते. त्यांच्या घरात त्यांनी सौरशक्तीवर चालणारे दिवे बसवले होते कारण सकाळी उठून नमाज पडणाऱ्या वयस्कर भावाला उजेडात नीट दिसावे असा हेतू होता कारण त्यांच्या गावात अजूनही वीज नाही, त्यांच्या घरातच एक पुस्तकांचे वाचनालय होते, त्यांचे घर हा अनेक प्रयोगांचा एक आरंभबिंदू होता.