उड्डाण परवाना जारी, राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते प्रारंभ होण्याची शक्यता

जगभरातील भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले श्रीसाईबाबांचे शिर्डी अखेर हवाई नकाशावर आले असून नागरी हवाई महासंचालनालयाने (डीजीसीए) शिर्डी विमानतळाला उड्डाण परवाना गुरुवारी जारी केला. श्रीसाईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षांचा प्रारंभ या विमानतळाच्या उद्घाटनाने होत असून ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.

राहता तालुक्यातील काकडी गावामध्ये असलेल्या विमानतळाचा रनवे अडीच हजार मीटरपेक्षा जास्त असून तो ए-३२० आणि बोइंग ७३७ जातींच्या विमानांसाठी पुरेसा असेल, अशी माहिती डीजीसीएच्या अधिकाऱ्याने दिली. राष्ट्रपतींचा दौरा जवळपास निश्चित झाल्याने डीजीसीएने उड्डाण परवाना देण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्याचे समजते. या विमानतळावर २७५० चौरस मीटरची टर्मिनल इमारत असून चार विमानांना पुरेल एवढय़ा हँगरची सुविधा आहे. रात्रीच्या उड्डाणासाठी मात्र अद्याप परवाना मिळालेला नसल्याचे समजते.

अगोदरच घोषित केल्याप्रमाणे श्रीसाईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे त्याचे नाव आहे. प्रारंभीच्या टप्प्यात मुंबई, दिल्ली आणि हैदराबादला शिर्डी जोडले जाईल. मुंबई आणि दिल्लीमधून अलायन्स एअरलाइन्स, तर हैदराबादहून ट्रजेटची सेवा असेल. नंतर तिचा विस्तार यथावकाश केला जाईल.

शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत दौरा निश्चित झाला नसला तरी राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित राहण्याची चर्चा होती. ३० सप्टेंबरला श्रीसाईबाबांची पुण्यतिथी आहे आणि त्यांचे समाधी शताब्दी वर्ष चालू होत आहे. ते निमित्त साधून शिर्डी हवाई नकाशावर आले आहे. जगभरातील भक्तांना त्याचा मोठा लाभ होईल.

सध्या हवाई सेवेमार्गे शिर्डीला पोहोचण्यासाठी मुंबई किंवा औरंगाबादला उतरावे लागते. मुंबईपासून सुमारे पाच- साडेपाच तास, तर औरंगाबादहून तीन तास लागतात. शिर्डीला रेल्वे स्थानक आहे, पण लांब पल्ल्याच्या गाडय़ांहून जायचे झाल्यास कोपरगाव किंवा मनमाडला उतरावे लागते. साईबाबांच्या मंदिरापासून विमानतळ सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. तिथून खास गाडय़ांची व्यवस्था केली जाणार आहे.