आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सय्यद हैदर रझा उर्फ एस.एच. रझा यांचे दीर्घ आजाराने दिल्लीमध्ये शनिवारी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून रझा यांची प्रकृती अस्थिर होती.  त्यांच्यावर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी ११ वाजता त्यांनी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. रझा यांच्यावर मध्य प्रदेशच्या मंडाला येथे  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
१९८३ साली ललित कला अकादमीमध्ये रझा यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. भारत सरकारने  १९८१ मध्ये पद्मश्री तर २००७ साली पद्म भूषण पुरस्काराने त्यांच्या कलेचा गौरव केला होता. २०१० साली भारताचे आधुनिक आणि सर्वाधिक महागडे कलाकार म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. सौराष्ट्र नावाच्या त्यांच्या चित्र संग्रहाला  १६.४२ करोड एवढी किंमत मिळाली होती. यावेळी ते ८८ वर्षाचे होते. सय्यद यांचा जन्म मध्यप्रदेशमधील मंडला जिल्ह्यातील बाबरिया या ठिकाणी झाला. आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामधील नागपूर कला विद्यालयामध्ये १९३९ ते १९४३ मध्ये कलेचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. पुढील कलेच्या शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील जे. जे. कला विद्यालयामध्ये प्रवेश घेतला.  मुंबईमध्ये त्यांनी १९४३ ते १९४७ या काळात शिक्षण घेतले.