दहा वर्षांसाठी ८.३० टक्के व्याजदर ;अर्थमंत्री अरुण जेटलींकडून शुभारंभ

ज्येष्ठ नागरिकांसाठी नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक नवी निवृत्तिवेतन योजना (पेन्शन प्लान) आणली असून त्यामध्ये दहा वर्षांच्या कालावधीसाठी आठ टक्क्यांचा (वार्षिक दर ८.३० टक्के) व्याजदर मिळणार आहे. व्याजदरांची घसरण चालू असताना ही योजना ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक पर्याय देणारी असू शकते.

आठ टक्क्यांचा घोषित व्याजदर आणि ‘एलआयसी’ला प्रत्यक्षात देता येणारा व्याजदर यांच्यातील फरकाची रक्कम केंद्र सरकार भरणार आहे. एलआयसीच्या कोष्टकानुसार, दरमहा एक हजार रुपये निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी दीड लाख, तर पाच हजार रुपये मिळविण्यासाठी साडेसात लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी ३ मे २०१८ पर्यंतची मुदत आहे. ही गुंतणवूक ऑनलाइन अथवा ऑफलाइनही करता येईल. तीन वर्षांनंतर ७५ टक्के कर्जही काढता येईल. त्याशिवाय मुदतीआधीच योजना बंद करता येऊ  शकते. त्या स्थितीमध्ये गुंतवलेल्या रकमेच्या ९८ टक्के रक्कम परत मिळेल.

दहा वर्षांच्या कालावधी संपताना विमाधारकाला संपूर्ण रक्कम व निवृत्तिवेतनाचा शेवटचा हफ्ता मिळेल आणि दहा वर्षांच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास गुंतविलेली रक्कम लाभार्थ्यांने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला मिळेल.

पंतप्रधान वय वंदना योजना

पंतप्रधान वय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय) असे नाव असलेल्या या योजनेचा शुभारंभ अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थमंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या ‘नॉर्थ ब्लॉक’मध्ये शुक्रवारी सांयकाळी केला. यापूर्वी मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) आणली होती. त्याच्या जोडीला ‘पीएमव्हीव्हीवाय’ असेल. या योजनेतून मिळणाऱ्या परताव्याला वस्तू व सेवा करातून (जीएसटी) वगळण्यात आले आहे. ‘एलआयसी’मार्फत ही योजना चालविली जाणार आहे.