आरोपांच्या पुष्टीसाठी ‘आप’कडून पोलीस आयुक्तांना पत्रे सादर
दिल्ली क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) कथित भ्रष्टाचार प्रकरणावरून आम आदमी पक्ष आणि भाजपमधून निलंबित केलेले खासदार कीर्ती आझाद यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आता नव्या आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. एका बँकेच्या क्रिकेट क्लबची चौकशी बंद करावी, यासाठी जेटली यांनी पोलीस आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. तर विशेष घोटाळा तपास पथकाने जेटली यांच्या विरोधात कारवाई करण्याची शिफारस केली होती, असा आरोप आझाद यांनी केला आहे.
‘आप’ने आपल्या आरोपांच्या पुष्टीसाठी जेटली यांनी दिल्लीचे तत्कालीन पोलीस आयुक्त बी. के. गुप्ता व विशेष आयुक्त रणजित नारायण यांना लिहिलेली दोन पत्रे सादर केली आहेत. त्यात ‘डीडीसीए’ने कसलीही चूक केली नसल्याने हे प्रकरण व्यवस्थितरीत्या हाताळण्याची व तपास बंद करण्याविषयी जेटली यांनी लिहिले आहे. काही व्यक्ती सिंडिकेट बँक क्रिकेट क्लबबद्दल दिल्ली पोलिसांकडे सातत्याने तक्रारी करीत आहेत. त्या निराधार असून अशा प्रकारांमुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये छळवणूक होत असल्याची भावना आहे. संघटनेकडून काहीही चूक झाली नसल्याने या प्रकरणाची चौकशी बंद करावी, अशी विनंती जेटली यांनी या पत्रात केली आहे. या नव्या खुलाशानंतर तरी त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ‘आप’ने केली आहे. यापैकी गुप्ता यांना लिहिलेले पत्र २७ ऑक्टोबर २०११ रोजीचे, तर नारायण यांना लिहिलेले पत्र ५ मे २०१२ रोजीचे आहे. या पत्रांमुळे जेटली यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा खोटा सिद्ध झाल्याचे ‘आप’चे वरिष्ठ नेते आशुतोष यांनी म्हटले आहे. ज्या वेळी जेटली यांनी ही पत्रे लिहिली, त्यापूर्वीच ते संघटनेच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधातील आरोप चुकीचे आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी जेटली यांचा बचाव केला.
दरम्यान, आपल्याविरोधात भ्रष्टाचाराचे बेबंद आणि निराधार आरोप होत असून त्याबद्दल ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आझाद यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ‘डीडीसीए’च्या वतीने सांगण्यात आले.