गोरक्षेच्या नावाखाली कथित गोरक्षकांकडून देशभरात सुरु असलेल्या उच्छादाविषयी राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी बोलताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन विरोधकांना केले. ‘हिंसेमुळे कोणताही प्रश्न सुटत नाही. हिंसा हा कोणत्याही प्रश्नावरील उपाय असू शकत नाही,’ असे जेटली यांनी राज्यसभेत बोलताना म्हटले. काँग्रेसकडून गोमांसाच्या मुद्यांचे राजकारण केले जात असल्याचा घणाघाती आरोपदेखील जेटलींनी केला.

‘गोरक्षेच्या नावाखाली कायदा हातात घेणे अयोग्य आहे. मात्र तरीही कोणी असे कृत्य करत असेल, तर या कृत्याचा निषेध व्हायला हवा. यासोबत गोरक्षेच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्या व्यक्तीला अटकदेखील व्हायला हवी,’ असे अर्थमंत्री अरुण जेटली राज्यसभेत म्हणाले. पंतप्रधान मरेंद्र मोदी यांनीदेखील गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्या कथित गोरक्षकांचा निषेध केला आहे, असेदेखील जेटली यावेळी बोलताना म्हणाले.

‘काँग्रेसकडून गोमांसावरुन राजकारण केले जाते आहे. त्यामुळे गोमांस, गोवंशहत्या यावरुन होणारे राजकारण थांबवण्यात यावे,’ असे अरुण जेटली यांनी राज्यसभेत म्हटले. ‘गोहत्या हा राज्यांच्या अखत्यारित येणारा विषय आहे. ज्या राज्यांमध्ये अशा घटना समोर आल्या आहेत, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी चर्चा केली आहे. गोरक्षेवरुन कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची सूचना सर्व राज्यांना देण्यात आली आहे. कथित गोरक्षकांना तातडीने अटक करण्यात यावी, असे आदेशदेखील देण्यात आले आहेत,’ असे जेटली यांनी सभागृहाला सांगितले.

‘ज्या राज्यांमध्ये गोरक्षणाच्या नावाखाली कथित गोरक्षकांनी हिंसाचार केला आहे, त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,’ असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत बोलताना म्हटले. गेल्या काही महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. गोतस्करी, गोमांसाच्या केवळ संशयावरुन जमावाकडून मारहाण करण्याच्या घटना देशभरात अनेक ठिकाणी घडल्या आहेत.