काँग्रेसने सत्तेत असतानाही देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळेच केले आणि आता विरोधात असतानाही त्यांचे तेच उद्योग सुरू आहेत, अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर शरसंधान केले. किसान विकासपत्र हे काळे पैसे दडविण्याचे उत्तम साधन आहे, या काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्याचा जेटली यांनी खरपूस समाचार घेतला. त्याबरोबरच तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेबाबतही अर्थमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्रिराष्ट्रीय दौऱ्याने भारताची जगातील प्रतिमा विलक्षण उंचावली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची तयारी दर्शवावी, हे याचेच द्योतक आहे, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नमूद केले. अदानी मायनिंग या अदानी उद्योग समूहातील गटाने ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे खनीकर्म सुरू केले आहे. त्यासाठी भारतीय स्टेट बँकेने त्यांना तब्बल १ अब्ज डॉलरचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. या मंजुरीवर काँग्रेसने आक्षेप घेतले आहेत. मात्र अर्थमंत्र्यांनी त्यावर सडकून टीका केली आहे.
फेसबुकवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत, ‘कर्जपुरवठा करणारी बँक आणि कर्जाची मागणी करणारे यांच्यातील व्यवहार हा सार्वजनिक चिंतनाचा आणि चर्चेचा विषय कधीपासून झाला?’ असा सवालच जेटली यांनी उपस्थित केला आहे. किसान विकासपत्रांबाबत सरकारी अधिसूचनेतील तरतुदी काँग्रसने वाचलेल्या दिसत नाहीत. ५० हजारांपेक्षा अधिक रकमेची किसान विकासपत्रे घेणाऱ्या व्यक्तीस आपला सर्व तपशील आणि पॅन कार्ड क्रमांक जाहीर करावा लागणार आहे, असे असतानाही काळा पैसा गुंतवणाऱ्यांना किसान विकासपत्रे हे आंदण ठरेल, असा काँग्रेसचा आरोप म्हणजे त्यांच्या उथळपणाचा उत्तम नमुनाच आहे, असा टोलाही जेटली यांनी हाणला.
काँग्रेसची अटेलतट्टू भूमिका
सत्तेत असताना काँग्रेसने देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आणि आता विरोधात असतानाही संसदेच्या कामकाजात खो घालून, वारंवार व्यत्यय आणून काँग्रेसचे अर्थव्यवस्थेला खड्डय़ात घालण्याचे प्रयत्न सुरूच आहेत, अशी खरमरीत टीका अर्थमंत्री जेटली यांनी केली.
 ममतांचे वक्तव्य दुर्दैवी
शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. मात्र कोणत्याही नव्या पक्षाने बनेल राजकारण्यांच्या वर्तुळातून पक्षाची सुटका करणे गरजेचे असताना ममता दीदींनी घेतलेली भूमिका दुर्दैवी आहे, असे मत जेटली यांनी व्यक्त केले.
कौतुकाची थाप
नवनियुक्त संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुश गोयल यांच्या पाठीवर अर्थमंत्री जेटली यांनी कौतुकाची थाप दिली. गोयल कोळसा आणि ऊर्जा खात्यात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नांत आहेत असे जेटली यांनी नमूद केले. संरक्षण सामग्री खरेदीबाबत नव्या संरक्षण मंत्र्यांनी रालोआ सरकारचीच भूमिका पुढे रेटली आहे. पंतप्रधानांच्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी अनेक मंत्र्यांना नियमित कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक वेळ काम करावे लागत आहे, असेही अर्थमंत्री जेटली यांनी नमूद केले.