सुमारे ४०० प्रवासी आणि दोन मालडब्यांचा समावेश असलेल्या रेल्वेगाडीचे सोमवारी प्रथमच नहारलगून स्थानकात आगमन झाले आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर रेल्वेच्या नकाशावर झळकली.
ही गाडी डेकारगाव येथून सकाळी सात वाजता सुटून दुपारी साडेबारा वाजता तिचे येथे आगमन झाले. सुमारे १८१ किलोमीटरचा प्रवास या गाडीने साडेपाच तासांत पूर्ण केला. सी.डी. शर्मा या प्रवाशाने डेकारगाव येथून नहारलगूनसाठी प्रथम तिकीट घेतले. आपण केवळ ३५ रुपयांत एवढा मोठा प्रवास केला, असे सांगत शर्मा यांनी अरुणाचल प्रदेशसाठी सोमवारचा दिवस अत्यंत मोठा असल्याचे आनंदाने सांगितले.
अरुणाचल प्रदेशला दिल्लीशी जोडण्यासाठी राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेस लवकरच सुरू करण्यात येतील, असे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबम तुकी यांनी सांगितले. रेल्वे सुरू झाल्यामुळे अरुणाचल प्रदेश आता मुख्य प्रवाहात जोडला जाईल, असे ते म्हणाले.