देशभरात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीच्या चळवळीत सुप्रसिद्ध लेखिका अरूंधती रॉय सहभागी झाल्या आहेत. रॉय यांनी त्यांना १९८९ साली मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार सरकारला परत करताना गोमांसबंदी, अल्पसंख्याकांवरील हल्ले, विचारवंतांच्या हत्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील गदा आणि भाजप तसेच संघाच्या वाचाळवीरांनी केलेल्या वक्तव्यांविरोधात पुरस्कारवापसी करणाऱ्या लेखक, कलाकार आणि विचारवंतांनी सुरू केलेल्या चळवळीत सहभागी होणे अभिमानास्पद वाटत असल्याचे रॉय यांनी म्हटले. मात्र, आपली पुरस्कारवापसी ही असहिष्णुतेविरोधात नाही, कारण देशात जे घडतंय त्यासाठी अहिष्णुता हा शब्द फारच सौम्य असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. देशातील वैचारिक दुष्टचक्र आणि बुद्धिमत्तेवरील आघाताविरोधात हा लढा उभा राहिला आहे. त्यामुळे ही चळवळ अभूतपूर्व अशी म्हणावी लागेल, असे अरुंधती रॉय यांनी म्हटले.
अरुंधती रॉय यांना १९८९ मध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार त्यांनी परत केला आहे. १९९७ मध्ये ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीसाठी त्यांना बुकर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.