दिल्लीच्या नायब राज्यपालांविरुद्ध आम आदमी पार्टीचा (आप) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष आता अधिकच विकोपाला गेल्याचे संकेत मिळत आहेत. नायब राज्यपालांना सर्वाधिकार देण्याबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर चर्चा करण्यासाठी आप सरकारने मंगळवारपासून दिल्ली विधानसभेचे दोन दिवसांचे तातडीचे अधिवेशन बोलाविले आहे.
दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आणि पोलीस व सर्वसामान्य जीवन सुरळीत ठेवण्याबाबतच्या प्रश्नांचे सर्वाधिकार नायब राज्यपालांना केंद्र सरकारने अधिसूचनेद्वारे दिले, त्यावर चर्चा करण्यासाठी हे तातडीचे अधिवेशन बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जूनमध्ये दिल्ली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.केंद्र सरकारने जारी केलेली अधिसूचना आणि निवडून आलेले सरकार आणि नायब राज्यपाल यांच्या अधिकारांबाबत या अधिवेशनात प्रामुख्याने चर्चा होणार आहे.
दिल्ली सरकारने घटनातज्ज्ञ के. के. वेणुगोपाळ आणि माजी सॉलिसिटर जनरल गोपाळ सुब्रह्मण्यम यांचा अभिप्राय घेतला. केंद्राने काढलेली अधिसूचना घटनेतील तरतुदींच्या विरोधात असल्याचा अभिप्राय या दोन्ही तज्ज्ञांनी दिला आहे. हा अभिप्राय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला.
केजरीवाल यांना नाटक करण्यातच स्वारस्य-रिजीजू
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविल्याने केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. केजरीवाल यांना केवळ ‘नाटक’ करण्यातच स्वारस्य आहे, तर एनडीएचा उत्तम कारभारावर विश्वास आहे, असे रिजिजू यांनी म्हटले आहे.