आयोगाची केजरीवाल यांना तंबी

गोव्यातील प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फटकारले आहे. यापुढे आचारसंहितेचा भंग केल्यास आम आदमी पक्षाची मान्यता रद्द करणे किंवा इतर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी आयोगाने केजरीवाल यांना दिली.

‘‘तुम्ही आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणूक प्रचारसभेत बोलताना अधिक सावधगिरी बाळगावी. यापुढे आचारसंहितेचा भंग केल्यास आपल्याविरोधात आणि पक्षाविरोधात ‘पक्षचिन्ह आदेश १९६८ च्या परिच्छेद १६ अ’ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल’’, असे आयोगाने शुक्रवारी केजरीवाल यांना जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. या तरतुदीनुसार आचारसंहितेचा भंग करणाऱ्या किंवा आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या पक्षांची मान्यता रद्द करण्याचा अधिकार आयोगाला आहे.

‘‘काँग्रेस आणि भाजप निवडणुकीत पैसे वाटतील. लोकांनी नव्या चलनातील नोटा स्वीकाराव्यात आणि महागाईचा विचार करता या पक्षांकडून पाच हजारांऐवजी दहा हजार रुपये घ्यावेत. मात्र मतदान आम आदमी पक्षालाच करावे’’, असे वादग्रस्त वक्तव्य केजरीवाल यांनी गोव्यातील प्रचारसभेत केले होते. याप्रकरणी निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना १६ जानेवारीला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात केजरीवाल यांनी आचारसंहितेचा भंग केलेला नाही, असा दावा केला होता. तर आयोगाने केजरीवाल यांना २०१५ मध्ये बजावलेल्या नोटिशीचे स्मरण करून दिले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या आदशाचे काँग्रेस, भाजपने स्वागत केले आहे.