दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मानहानी प्रकरणात २१ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  आज या प्रकरणाची सुनावणी होती. अरविंद केजरीवाल हे उपचारासाठी बंगळुरूमध्ये आहेत. ते २२ फेब्रुवारी रोजी परतणार आहेत. त्यामुळे आज, व्यक्तिशः हजर राहण्यापासून सूट मिळावी अशी विनंती केजरीवाल यांच्या वकिलांनी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. त्यांना २१ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

डीडीसीए आणि चेतन चौहान यांनी केजरीवाल यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणावर आज सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या वकिलाने त्यांची बाजू मांडली. पुढील सुनावणी २१ मार्च रोजी आहे. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी हजर राहावे असे न्यायाधीश अभिलाष मल्होत्रा यांनी म्हटले.  आपण मुद्दामहून आजचा सुनावणीस गैरहजर राहिलो नसल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. मी उपचारासाठी बंगळुरू येथे आहे तेव्हा कृपया मला आज सूट देण्यात यावी असे ते म्हणाले.

किर्ती आझाद यांना आज या प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. १०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.  भ्रष्टाचाराव्यतिरिक्त अनेक गैरव्यवहारांमध्ये डीडीसीएचे पदाधिकारी गुंतलेले आहेत असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. त्यानंतर डीडीसीए आणि क्रिकेटर चेतन चौहान यांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता.

अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपामुळे डीडीसीएची प्रतिमा मलीन झाल्याचे डीडीसीएने म्हटले आहे. त्यांच्या बेजाबदार वक्तव्यामुळे डीडीसीएच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे डीडीसीएने आपल्या अर्जात म्हटले आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे डीडीसीएची प्रतिमा डागाळली असे प्रथमदर्शनी वाटते, असे न्यायालयानेही मान्य केले आहे. अरविंद केजरीवाल यांचे हे वक्तव्य केवळ टी. व्ही. पुरते मर्यादित न राहता, इंटरनेट आणि वृत्तपत्रांमध्ये देखील आले होते. त्यामुळे देखील डीडीसीएला नुकसान झाल्याचे अर्जात म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वाक्याचा संदर्भ देऊन किर्ती आझाद यांनी देखील त्या वाक्याचा वेळोवेळी उच्चार केला होता.