अर्थ मंत्री अरुण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आरोप निश्चित केले आहेत.  अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर आम आदमी पार्टीच्या पाच  नेत्यांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या सर्वांनी आपण निर्दोष आहोत असे न्यायालयाला सांगितले आहे. २० मे रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

या खटल्यात केजरीवाल यांचे वकीलपत्र राम जेठमलानी यांनी घेतले आहे. एका सुनावणीच्या वेळी राम जेठमलानी यांनी अरुण जेटलींनी अडचणीचे ठरतील असे प्रश्न विचारले होते. त्याची चर्चा झाली होती. या सुनावणीवेळी तुम्ही स्वतःला महान समजता का? असा प्रश्न राम जेठमलानी यांनी अरुण जेटली यांना विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना कायद्याचा अभ्यास असणारे अरुण जेटली देखील गोंधळले होते. दिल्लीतील न्यायालयात काही तास चाललेल्या खटल्यादरम्यान राम जेठमलानी यांनी अरुण जेटली यांना अनेक पेचात टाकणारे प्रश्न विचारले. ‘तुमच्या सन्मानाला असा कोणता धक्का बसला आहे, ज्याचे नुकसान मोजता येणार नाही?’ असा अडचणीचा प्रश्न जेठमलानी यांनी अरुण जेटली यांना विचारला होता.

अरविंद केजरीवाल यांनी डीडीसीए विरोधातही गंभीर आरोप केले होते.  भ्रष्टाचाराव्यतिरिक्त अनेक गैरव्यवहारांमध्ये डीडीसीएचे पदाधिकारी गुंतलेले आहेत असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. त्यानंतर डीडीसीए आणि क्रिकेटर चेतन चौहान यांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपामुळे डीडीसीएची प्रतिमा मलीन झाल्याचे डीडीसीएने म्हटले आहे. त्यांच्या बेजाबदार वक्तव्यामुळे डीडीसीएच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे डीडीसीएने आपल्या अर्जात म्हटले आहे.

त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे डीडीसीएची प्रतिमा डागाळली असे प्रथमदर्शनी वाटते, असे न्यायालयानेही मान्य केले आहे. अरविंद केजरीवाल यांचे हे वक्तव्य केवळ टी. व्ही. पुरते मर्यादित न राहता, इंटरनेट आणि वृत्तपत्रांमध्ये देखील आले होते. त्यामुळे देखील डीडीसीएला नुकसान झाल्याचे अर्जात म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वाक्याचा संदर्भ देऊन किर्ती आझाद यांनी देखील त्या वाक्याचा वेळोवेळी उच्चार केला होता.