आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसला उत्तर देताना आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपणास निवडणूक आयोगाचा ‘ब्रॅंडअॅम्बेसिडर’ बनिवण्यात यावे अशी मागणी केली आहे. गोव्यामधील प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. जर तुम्हाला कुणी पैसे देऊ केले तर ते स्वीकारा परंतु मतदान मात्र आम आदमी पार्टीला करा असे त्यांनी म्हटले होते.

त्यांच्या या वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्या नोटीसला उत्तर देताना आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहे असे म्हटले जात आहे परंतु मी तर भ्रष्टाचार विरोधी आहे असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. पैसे घ्या आणि त्याच पार्टीला मत द्या असे म्हटले असते तर मी भ्रष्टाचाराचे समर्थन करीत आहे असे म्हणण्यात काही तथ्य होते परंतु मी तर अगदी उलट सांगत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मी म्हणत आहे पैसे घ्या परंतु भ्रष्ट लोकांना मत देऊ नका. जर माझे म्हणणे निवडणूक आयोगाने ऐकले तर मतदानामध्ये पैसे वाटणेच लोक बंद करतील. निवडणूक आयोगाने माझ्या म्हणण्याचा प्रचार प्रसार करावा. तुम्ही तर माझी सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करायला हवी असे त्यांनी या उत्तरादाखल सादर केलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून निवडणुकांमध्ये पैशांचा वापर होऊ नये म्हणून निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. परंतु त्यांच्या या प्रयत्नाला अद्याप यश मिळाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर आपण हा प्रयोग यशस्वीरित्या राबविला असल्याचे ते म्हणाले. दिल्लीमध्ये पुढील निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप पैशांचा वापर करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

८ जानेवारी रोजी झालेल्या सभेतच नव्हे तर मी प्रत्येक सभेत मतदारांना हे सांगत असतो की पैसे घ्या परंतु मत मात्र झाडूलाच द्या. याआधी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका लढविण्यास देखील आम आदमी पक्षाकडे पैसे उरले नसल्याचे त्यांनी म्हटले होते. आमच्या पक्षाच्या खात्यामध्ये पैसे नाहीत असे त्यांनी म्हटले. परंतु आम्ही गोवा आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवत आहोत असे ते म्हणाले. आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेशात निवडणूक न लढविण्याचा विचार केला आहे.