पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवर पर्याय उपलब्ध करून देण्याचा मानस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापाठोपाठ ममतादिदींची राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षा वाढल्याचे सूचित होते.

केजरीवाल यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. दिल्लीपाठोपाठ पंजाबजी सत्ता हस्तगत करण्यासाठी केजरीवाल यांनी सारा जोर लावला आहे. गोवा आणि गुजरात या दोन राज्यांवर त्यांनी सध्या लक्ष केंद्रित केलेले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीबरोबरच आणखी एका राज्याची सत्ता हाती आल्यास आम आदमी पार्टी वातावरणनिर्मिती केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक केल्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपविरोधी सर्व समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाचे वेध लागले आहेत. काँग्रेस कमकुवत असल्यास विरोधी पक्षांचा सहमतीचा उमेदवार म्हणून नाव पुढे येईल, अशी त्यांची अटकळ आहे. अर्थात, नितीशकुमार यांनी केलेल्या आवाहनाला एकाही राजकीय पक्षाने दाद दिलेली नाही याकडे नितीशकुमार यांचे विरोधक लक्ष वेधतात.

सध्या दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांचीही महत्त्वाकांक्षा वाढली आहे. आपण पश्चिम बंगालमध्येच राहणार असे सांगतानाच, भाजपच्या विरोधात पर्याय उभा करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाल्याने ममतादिदींच्या आशा साहजिकच पल्लवीत झाल्या आहेत. तामीळनाडूमध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा सत्ता न मिळण्याची परंपरा मोडीत काढून पुन्हा सत्तेत आलेल्या तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचाही डोळा दिल्लीच्या तख्तावर आहे. अण्णा द्रमुकच्या समर्थकांकडून जयललिता ऊर्फ अम्मांना पंतप्रधान करण्याची मागणी  अधूनमधून केली जाते.

काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्याने प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पातळीवरील पर्याय म्हणून उभा करण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न आहे. पुढील सार्वत्रिक निवडणुकीत तशीच वेळ आल्यास नितीशकुमार यांच्या नावावर सहमती होऊ शकते. सार्वत्रिक निवडणुकीला अजून तीन वर्षांचा कालावधी असला तरी नेतेमंडळींना आतापासूनच वेध लागले आहेत.