आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मेहुणे सुरेंद्र कुमार बंसल यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल झाली आहे. बंसल हे कंत्राटदार आहेत. त्यांनी सामाजिक बांधकाम विभागाच्या कंत्राटांमध्ये पैशांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार राहुल शर्मा नावाच्या व्यक्तीने केली आहे. बंसल यांनी नाल्या आणि रस्त्यांच्या कामामध्ये पैशांचा गैरव्यवहार केल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे. खोट्या नावांनी अर्ज करुन बंसल यांनी कंत्राट मिळवले असे शर्मांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

बंसल यांनी जनतेच्या पैशांचा गैरवापर केल्याचे शर्मांनी म्हटले आहे. या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी देखील करण्यात यावी असे शर्मांनी म्हटले आहे. त्यांच्या इतर नातेवाइकांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन आपल्या नातेवाइकांना कंत्राट मिळवून दिल्याचे शर्मा यांचे म्हणणे. बंसल यांच्याविरोधात केवळ तक्रार दाखल झाली आहे. याची प्राथमिक चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतरच त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या त्यांना दोषी ठरवणे चूक ठरेल असे देखील ते म्हणाले.