दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे १० दिवसांची सुट्टी घेऊन विपश्यना करण्यासाठी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या सुट्टीच्या काळात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे कामकाज बघतील अशीही माहिती समोर आली आहे. ‘एनडीटीव्ही’ ने दिलेल्या बातमीनुसार अरविंद केजरीवाल आणि विपश्यना यांचे नाते बरेच जुने आहे. अरविंद केजरीवाल हे राजकारणात यायच्या आधीपासून विपश्यना केंद्रांमध्ये जाऊन विपश्यना करतात. आजवर देशभरातील विविध विपश्यना केंद्रामध्ये त्यांनी हजेरी लावली आहे. विपश्यना केल्यामुळे आपल्यात नवी उर्जा निर्माण होते असे अरविंद केजरीवाल यांनी याआधीही म्हटले आहे.

केजरीवाल आणि मनिष सिसोदिया हे दोघेही ध्यान, योगधारणा करण्यासाठी विविध विपश्यना केंद्रामध्ये जात असतात. यावेळी मात्र मागील वर्षीप्रमाणेच अरविंद केजरीवाल हे एकटेच नाशिकमधील विपश्यना केंद्रात हजेरी लावणार आहेत. याआधी धर्मशाळा या ठिकाणी असलेल्या विपश्यना केंद्रात अरविंद केजरीवाल यांनी हजेरी लावली होती. बंगळुरूमध्ये असलेल्या निसर्ग उपचार केंद्राचाही दौरा केजरीवाल यांनी केला आहे.

विपश्यना ही अशी प्रकारची ध्यानधारणा आहे ज्याचे नियम इतर ध्यानधारणेच्या तुलनेत कठीण असतात. विपश्यना केंद्रात गेलेला साधक हा रोजचे जीवन, आपले कुटुंब आणि बाहेरील जगाच्या संपर्कात नसतो. विपश्यना केंद्रांमध्ये कोणत्याही साधकाला एकमेकांशी संवाद साधता येत नाही.

दोन दिवसांनंतर कोणता दिवस आहे हे आपल्याला कळतही नाही अशी प्रतिक्रिया विपश्यना केंद्रात जाऊन आलेल्या साधकांनी दिली आहे. मोबाइल, वर्तमानपत्र, टीव्ही या सगळ्यांचा वापर विपश्यना केंद्रात करता येत नाही. आता अरविंद केजरीवाल हेदेखील दरवर्षीप्रमाणे विपश्यना केंद्रात हजेरी लावणार आहेत. १० दिवस ते नाशिकमध्ये असलेल्या विपश्यना केंद्रात थांबणार आहेत अशी माहिती समोर येते आहे.