दिल्लीतील आगामी पालिका निवडणुकांसाठी ईव्हीएमचा (ईलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स) वापर केला जाऊ नये, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीतील तीन महानगरपालिका निवडणुकांच्या तारखांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. येत्या एप्रिल महिन्यात या निवडणुका होणार आहेत. मात्र, या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशिन्सचा वापर केला जाऊ नये, असे अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आपण यासंदर्भात मी पत्र लिहून निवडणूक आयोगाला विनंती केली आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले होते. याशिवाय, महाराष्ट्रातील पालिका निवडणुकांमध्येही भाजपने लक्षणीय यश मिळवले होते. उत्तरप्रदेशमधील मुस्लिमबहूल भागात भाजपला जास्त मते कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित करत हिंमत असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी व्होटींग मशिनऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे असे खुले आव्हान मायावती यांनी निकालानंतर दिले होते.मतदान यंत्रातील कुठलेही बटण दाबले तरी ते मत भाजपच्या उमेदवाराला पडेल अशा रितीने या यंत्रांमध्ये घोटाळा करण्यात आला असा आरोप मायावतींनी केला होता. महाराष्ट्रातदेखील अनेक राजकीय पक्षांनी अशाचप्रकारचा आरोप केला होता.

दरम्यान, निवडणुकांची घोषणा झालेल्या तिन्ही महानगरपालिकांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. यावेळी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे आव्हान लक्षात घेता भाजपने या निवडणुकांमध्ये विशेष रणनिती आखण्यात आली आहे. त्यानुसार, भाजप यंदा पालिका निवडणुकांसाठी सर्वच्या सर्व नवे चेहरे देणार आहे. एकाही विद्यमान नगरसेवकाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना या निवडणुकीत उमेदवारी देण्यात येणार नाही. काही दिवसांपूर्वीच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देष दिले आहेत.