समाजमाध्यमांवरील टीकेनंतर स्पष्टीकरण; लालूंच्या कार्यपद्धतीला विरोधच
चारा घोटाळ्यात तुरुंगवासाची शिक्षा झालेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मारलेली मिठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फारच टोचली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शपथविधी समारंभातील लालू-केजरीवाल यांच्या आनंदी गळाभेटीचे चित्र समाजमाध्यमांमध्ये फिरल्यानंतर केजरीवाल यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दलच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे अखेरीस केजरीवाल यांना आपली बाजू स्पष्ट करावी लागली. लालू यांनीच आपल्याला ओढून आलिंगन दिल्याचे सांगत त्यांनी वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.
आपण लालू यांच्या भ्रष्टाचाराविरोधात असून त्यांचा कायम विरोधच करू. तसेच, दोन मुले मंत्रिमंडळात समाविष्ट करणा-या लालू यांच्या घराणेशाहीविरोधातदेखील आहोत. या आलिंगनामुळे आमची युती झाली, असा अर्थ होत नसल्याचे ते म्हणाले. ‘आप’मधून हकालपट्टी झालेल्या योगेंद्र यादव यांनीही केजरीवाल यांच्यावर टीका केली होती.

केजरीवाल यांची कृती निंदनीय असून भ्रष्टाचारविरोधासाठी स्थापन झालेल्या संघटनेची राजकीय पुंजी भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेल्यांना विकली गेली, अशा शब्दांत त्यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. करोडो रुपयांच्या चारा घोटाळ्यात दोषी सिद्ध झालेल्या लालू यांना केवळ २५ लाख रुपयांचा दंड आणि काही वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याबद्दल केजरीवाल यांनी दोन वर्षांपूर्वी असमाधान व्यक्त केले होते.