29 March 2017

News Flash

दिल्ली बलात्कार प्रकरणी तरुणीही आरोपींइतकीच दोषी

"दिल्लीतील बलात्कार प्रकरणी फक्त पाच ते सहा आरोपी दोषी नाहीत. बलात्कार करणाऱ्यांइतकीच बलात्कारित तरुणीही

वृत्तसंस्था, जयपूर | Updated: January 8, 2013 2:10 AM

“दिल्लीतील बलात्कार प्रकरणी फक्त पाच ते सहा आरोपी दोषी नाहीत. बलात्कार करणाऱ्यांइतकीच बलात्कारित तरुणीही या प्रकारात दोषी आहे. तिने बलात्कार करणाऱ्यांशी भावाचे नाते जोडून त्यांच्याकडे ते करीत असलेले कृत्य थांबविण्यासाठी याचना करावयास हवी होती. यामुळे तिची प्रतिष्ठा आणि जीव वाचला असता. एका हाताने टाळी वाजू शकते? वाजू शकते असे मला वाटत नाही,..” अशी धक्कादायक प्रतिक्रिया स्वघोषित धर्मगुरु आसाराम बापू यांनी येथे व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले,”या तरुणीने सरस्वती मंत्राचे पठन केले असते, तर तिने आपल्या मित्राबरोबर चित्रपट पाहिल्यानंतर कोणत्याही बसमधून प्रवास केला नसता.”
आसाराम बापूंच्या या वक्तव्यावर प्रमुख राजकीय पक्षांनी कडाडून टीका केली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते रशीद अल्वी म्हणाले,”व्यवहारात इतक्या बाळबोध पद्धतीने घटना घडत नाहीत. महिलांना किती यातनांना तोंड द्यावे लागते ते आसाराम बापूंना कोणीतरी सांगायला हवे.”
“राजकीय तसेच धार्मिक नेत्यांनी गंभीरपणे विचार करून बोलायला हवे. आसाराम बापूंसारख्यांनी इतकी बालिश सूचना करावी, हे निषेधार्ह तसेच हास्यास्पद आहे,” असे भाजपचे नेते बलबीर पुंज यांनी सांगितले. विविध संकेत स्थळांवरूनही आसाराम बापूंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.

First Published on January 8, 2013 2:10 am

Web Title: asaram bapu shocks holds girl responsible for delhi gang rape