स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू आणि त्याचा मुलगा नारायण साईला आता राजकारणाचे वेध लागले आहेत. आसाराम बापूचा ओजस्वी पक्ष उत्तरप्रदेशमधील निवडणूक लढवणार आहे. आसाराम बापूचा मुलगा नारायण साईने न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला असून नारायण साई उत्तरप्रदेशमधील दोन जागांवरुन निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.

आसाराम बापूचा ओजस्वी पक्ष उत्तरप्रदेशमधील निवडणुकीत उतरणार आहे. गाझियाबाद आणि शिवपूर या दोन मतदार संघातून नारायणसाई स्वतः निवडणूक लढवण्यास तयार आहे. ओजस्वी पक्षात नारायण साई हादेखील संस्थापक सदस्य आहे. ओजस्वी हा पक्ष उत्तरप्रदेशमधील १५० जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नारायण साईच्यावतीने गुरुवारी सुरतमधील अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करण्यात आला आहे.  निवडणुकीच्या तयारीसाठी जामीन द्यावा अशी विनंती नारायणसाईने कोर्टात केली आहे. नारायण साईच्या याचिकेवर २१ जानेवारीरोजी सुनावणी होणार आहे.

नारायण साईला डिसेंबर २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. नारायण साई आणि आसाराम बापूवर सुरतमधील एका महिलेने २००२ ते २००५ या कालावधीत बलात्कार केल्याचा आरोप केला होता. सुरतमधील आश्रमात असताना नारायण साईने बलात्कार केल्याचा आरोप होता. यानंतर पीडित महिलेच्या मोठ्या बहिणीनेही अहमदाबादमधील आश्रमात असताना १९९७ ते २००६ या कालावधीत बलात्कार केल्याचा आरोप केला होता. सध्या आसाराम जोधपूरमधील तुरुंगात आणि नारायणसाई सुरतमधील तुरुंगात आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा- ११ फेब्रुवारी, दुसरा टप्पा- १५ फेब्रुवारी, तिसरा टप्पा- १९ फेब्रुवारी, चौथा टप्पा- २३ फेब्रुवारी, पाचवा टप्पा- २७ फेब्रुवारी, सहावा टप्पा-४ मार्च तर सातव्या टप्प्यात ८ मार्च रोजी मतदान होईल. या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली असतानाच बलात्काराच्या आरोपाप्रकरणी तुरुंगात असलेले आसाराम बापू आणि त्याचा मुलगा नारायण साईचा पक्ष काय कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.