पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) तेराव्या शिखर परिषदेच्या ठिकाणचे भारतीय राष्ट्रध्वजाचे सोशल मिडीयावर फिरत असलेले छायाचित्र चुकीचे असल्याची स्पष्टोक्ती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या पीआयबी विभागातील सहायक संचालक महिमा वसिष्ठ यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

असिआन परिषदेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांच्याशी औपचारिक हस्तांदोलन करताना मागच्या बाजूला असणाऱ्या स्टँडवर भारताचा राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने फडकवण्यात आल्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून लगेचच या प्रकाराची चौकशी करण्यात आली. या चौकशीअंती हे छायाचित्र चुकीचे असल्याचे स्पष्ट झाल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.