ख्यातनाम पाश्र्वगायिका आशा भोसले यांना दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आशा भोसले (वय ८१) यांची १२ हजार गाणी ध्वनिमुद्रित झालेली असून त्यात लोकसंगीत, भारतीय अभिजात संगीत, पॉप संगीत, गझल व भजन इतकी विविधता आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याने आपल्याला आनंद झाला आहे. या चित्रपट महोत्सवास आपण उपस्थित राहणार आहोत, असे आशा भोसले यांनी सांगितले. जास्तीत जास्त ध्वनिमुद्रण झालेल्या कलाकार म्हणून त्यांच्या नावाची नोंद  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
उपग्रह प्रक्षेपण लांबणीवर
बेंगळुरू- भारताच्या जीसॅट १६ या उपग्रहाचे उड्डाण दुसऱ्यांदा लांबणीवर टाकण्यात आले आहे. खराब हवामानामुळे हा निर्णय घेण्यात आला. फ्रेंच गयाना येथील कावरू अवकाशतळावरून तो सोडण्यात येणार होता, असे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले. शनिवारी पहाटे २ वाजता हा उपग्रह सोडण्यात येणार होता. पण हवामान खराब झाल्याने प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले.
दंगल चौकशी आयोगास मुदतवाढ
मुझफ्ऱ्फ रनगर- उत्तर प्रदेश सरकारने मुझफ्फरनगर दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगास तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर आयोगाने काही अधिकाऱ्यांची निवेदने नोंदवण्याचे काम करण्याचे ठरवले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विष्णू सहाय यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी ९ सप्टेंबरला या दंगलीची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यात आला होता.