आमदार आशा कुमारींची नियुक्ती

हिमाचल प्रदेशमधील आमदार आशा कुमारी यांची काँग्रेस पंजाबमध्ये प्रभारी सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. दिल्लीत १९८४ च्या शिखविरोधी दंगलीत सहभाग असल्याच्या आरोपानंतर कमलनाथ यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे. जमीन बळकावल्याप्रकरणीच्या खटल्यात त्यांना शिक्षा झाल्याने या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केली आहे.

आशा कुमारी डलहौसी येथील आमदार आहेत. विशेष म्हणजे कुमारी यांना २६ फेब्रुवारी जमीन बळकावल्याप्रकरणी एका खटल्यात चंबा न्यायालयाने एक वर्षांची कैद व आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. गुन्हेगारी कट केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. मात्र हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने एक वर्ष शिक्षेला स्थगिती दिली होती. चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या कुमार यांच्यासह सहा जणांवर दहा वर्षांपासून खटला सुरू आहे.

विरोधकांची टीका

विरोधकांनी या निवडीवर टीका केली आहे. ज्या व्यक्तीला नुकतीच शिक्षा झाली आहे त्यांची नियुक्ती होणे हे पाहता काँग्रेसकडे चांगले नेते नाही अशी टीका भाजपचे पंजाबमधील नेते विनीत जोशी यांनी केली आहे.