गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे भारतीय जनता पक्ष तेथील मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना पदावरून पायउतार करण्याचा विचार करीत असल्याचा दावा आपचे नेते आशुतोष यांनी केला. ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या गुजरात यात्रेमुळे भाजपचे नेते घाबरून गेले आहेत. त्यामुळेच येत्या दोन ते तीन महिन्यात ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपकडून गुजरातमधील मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यामध्ये सध्या तरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, नितीन पटेल आणि पुरुषोत्तम रुपाला यांची नावे स्पर्धेत असल्याचे समजते, असे आशुतोष यांनी ट्विटरच्या साह्याने म्हटले आहे.
गुजरातमधील पाटीदार समाजाचे आरक्षणासाठी झालेले आंदोलन, उनामधील दलितांवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण यामुळे तेथील मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल अडचणीत आल्या आहेत. त्यातच पुढील वर्षाच्या शेवटी गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आतापासूनच ‘आप’ने तेथे लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. एका सर्वेक्षणाच्या हवाल्याने आशुतोष यांनी म्हटले आहे की, गुजरातमध्ये आज जर विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर तिथे आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर येईल. ‘आप’च्या तुलनेत तिथे भाजप कुठेच नाही.
अरविंद केजरीवाल यांनी दोनवेळा गुजरातचा दौरा केल्यानंतर भाजपमध्ये लगेचच तेथील आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यावर विचार सुरू झाला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये आनंदीबेन पटेल यांना हटवून त्यांच्या जागी दुसऱ्या नेत्याला संधी देण्याची शक्यता असल्याचे आपल्याला सूत्रांकडून समजले असल्याचे आशुतोष यांनी म्हटले आहे. आम आदमी पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून गुजरातमध्ये पक्षविस्तारास सुरुवात केली आहे. केजरीवाल यांनी सोमनाथ मंदिरापासून ‘आप’च्या प्रचाराची सुरुवातही केली होती. त्याचबरोबर त्यांनी पाटीदार समाजाच्या लोकांचीही भेट घेतली होती. दिल्लीमध्ये आप आणि केंद्रातील भाजप सरकार यांच्यामध्ये रोज नवनव्या मुद्द्यांवरून वाद सुरू असताना आता ‘आप’ने गुजरातमध्ये भाजपवर कुरघोडी करण्याची रणनिती आखली असल्याचे दिसू लागले आहे.