लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि मुंबईवरील हल्ल्याच्या कटाच्या सूत्रधारांपैकी एक डेव्हिड कोलमन हेडली याची सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेतील तुरूंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे साक्ष नोंदविली जात आहे. पाकिस्तानातील ‘आयएसआय’ने ISI लष्कर-ए-तोयबाच्या साथीने मुंबईवरील हल्ल्याचा कट रचल्याचा दावा करून हेडलीने २६/११च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले. त्यानंतर ‘आयएसआय’साठी हेरगिरी करतील अशी माणसे भारतीय सैन्यात भरती करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा हेडलीने मंगळवारी केला. हेडलीच्या या खुलाशामुळे पाकिस्तानचा नापाक चेहरा जगासमोर आला आहे. लष्कर-ए-तोयबावर अमेरिकेने घातलेल्या बंदीला कायदेशीर आव्हान देण्याचा सल्लाही आपण हाफीज सईद आणि लख्वी यांना दिला होता, असेही हेडलीने कबुल केले आहे. यासोबतच मुंबई हल्ल्यावेळी नौदल, वायूदल आणि पोलीस मुख्यालयासोबतच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराही लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर होते, असे हेडलीने जबाबात म्हटले आहे.

हेडलीने आज केलेले खुलासे-
* मुंबईतील ताज हॉटेलमध्ये होणाऱया संरक्षण क्षेत्रातील संशोधक व शास्त्रज्ञांच्या संमेलनाला टार्गेट करण्याचा हेतू होता.
* साजिद मीर यानेच ताज हॉटेलच्या दुसऱया मजल्याची रेकी करायला सांगितले होते.
* ताज हॉटेल, नौदल आणि वायू दलाचे मुख्यालय, सिद्धीविनायक मंदिर देखील निशाण्यावर होते.
* हाफिज सईद व लख्वी यांच्या उपस्थितीत मी इतर १०२ लोकांसोबत दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले होते.
* २००७ साली ‘लष्कर-ए-तोयबा’ने मुंबईवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.
* २००७ सालच्या नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये साजिद मीर साजिद, अबु खफा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मला मुंबईतील ताजमहल हॉटेलची रेकी करण्याचं टार्गेट देण्यात आले.
* झकी-उर-रेहमान-लख्वी हा ‘लष्कर-ए-तोयबाचा’ ऑपरेशनल कमांडर होता. मी त्याला २००३ साली पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये भेटलो होतो.
* लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल-मुजाहिद्दीन या सर्व दहशतवादी संघटना ‘युनायटेड जिहाद कौन्सिल’ अंतर्गत भारताविरोधात काम करतात
* मी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलो आहे, अशी तक्रार माझी पत्नी फैजा हिने इस्लामाबादमधील अमेरिकी दूतावासात २००८ साली नोंदवली होती.