चीनसोबत युद्ध झाले तर भारताला त्रासच होईल, भारताने हे युद्ध टाळले पाहिजे असे वक्तव्य आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले आहे. चीन आपल्यापेक्षा शक्तिशाली देश आहे. त्यामुळे युद्ध झाले तर आपल्याला ते परवडणार नाही. आजच केंद्रीय संरक्षण मंत्री अरूण जेटली यांनी १९६२ सारखी परिस्थिती आता राहिलेली नाही, इतिहास लक्षात ठेवा अशी चीनची कानऊघडणी केली होती. मात्र याचा विरोधाभास साधत भाजप शासित राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी चीनसोबत युद्ध नको असे म्हटले आहे.

भारत आणि चीन हे स्वतंत्र होण्यात अवघ्या २ वर्षांचा फरक आहे, मात्र आजची स्थिती अशी आहे की आपण चीनला घाबरतो. चीन हे शक्तीशाली राष्ट्र आहे, आपल्या देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे त्यामुळे आपण प्रगती साधू शकलो नाही. मात्र चीनने इतक्या वर्षात जास्त प्रगती साधली आहे. त्यामुळे आपल्याला चीनसोबत युद्ध परवडणार नाही, असेही पुरोहित यांनी म्हटले आहे.

सिक्कीममधल्या सीमारेषेवरून घुसखोरी करून चीनच्या सैनिकांनी भारतात अतिक्रमण केले. त्यानंतर दोन्ही देशांनी सिक्कीमच्या सीमेवर आपले प्रत्येकी तीन हजार सैनिक तैनात करून ठेवले आहेत. दोन्ही देशांमध्ये या घुसखोरीवरून तणाव वाढला आहे. इतकेच नाहीतर आम्ही युद्धासाठी तयार आहोत असे वक्तव्य सैन्यदलप्रमुख बिपिन रावत यांनी केले. त्यानंतर चीनने भारताला १९६२ च्या युद्धाची आठवण करून देत त्यावरून धडा गिरवा असे सुनावले. मात्र चीनने इतिहास लक्षात ठेवावा म्हणत अरूण जेटलींनी चांगलीच कानऊघडणी केली.

अशात बनवारीलाल पुरोहित यांनी मात्र चीनसोबत युद्ध नको असे म्हणत आहेत. दोन्ही देशांमधला तणाव वाढला आहे, अशात भारताचे मनोधैर्य खच्ची करणारे हे वक्तव्य पुरोहित यांनी केल्यामुळे देशातल्या जनतेचा संताप झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.