भारतीय हवाई दलाचे सुखोई ३० हे लढाऊ विमान आसाममधील तेजपूर परिसरात बेपत्ता झाले आहे. विमानात दोन वैमानिक असून युद्धपातळीवर विमानाचा शोध सुरु असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हवाई दलाचे सुखोई ३० हे विमान मंगळवारी नियमित सरावासाठी झेपावले होते. या विमानात दोन वैमानिक होते. आसाममधील तेजपूरच्या उत्तर भागात असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला. विमानाचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विमान तेजपूर परिसरात कोसळले असावे अशी शंकाही व्यक्त होत आहे.

मार्च महिन्यात राजस्थानमधील बारमेरमध्येही सुखोई ३० हे लढाई विमान कोसळले होते. या घटनेत तीन ग्रामस्थ जखमी झाले होते. हवाई दलाच्या ताफ्यातील सात सुखोई ३० विमानांचा आत्तापर्यंत अपघात झाला आहे. त्यामुळे या अपघातांचे नेमके कारण शोधण्याची गरज आता निर्माण झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.