आदिवासी नॅशनल कन्व्हेन्शन कमिटी (एएनसीसी) या संघटनेने केलेल्या ११ तासांच्या रेल्वे रोको आवाहनामुळे आसाम आणि देशाच्या इतर भागांदरम्यानची रेल्वे वाहतूक सोमवारी विस्कळीत झाली.

मात्र एएनसीसीच्या आंदोलकांनी पाच तासांनंतर त्यांचे आंदोलन मागे घेतले. या मुद्दय़ावर तत्काळ त्रिपक्षीय बोलणी करण्यासाठी आसाम सरकारने त्यांची मागणी केंद्र सरकारकडे मांडली असल्याची हमी कोक्राझारचे उपायुक्त विवेकानंद चौधरी यांनी दिल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली.

वेगवेगळ्या आदिवासी संघटनांच्या शेकडो सदस्यांनी आंदोलनात भाग घेतला आणि आपल्याला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी सकाळी ६ वाजेपासून कोक्राझार रेल्वे स्थानकावरील रुळांवर ठिय्या दिला.

या रेल्वे रोकोमुळे राजेंद्रनगर एक्सप्रेस अलिपूरद्वार स्थानकावर, सराईघाट एक्सप्रेस न्यू अलीपूर स्थानकावर व लोकमान्य टिळक एक्सप्रेस न्यू कूचबिहार स्थानकावर (सर्व उत्तर बंगालमध्ये), तर ब्रह्मपुत्रा मेल धुपगुडी स्थानकावर थांबवण्यात आली, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.