आसाममध्ये तब्बल ८०हून अधिक निष्पाप आदिवासींची हत्या करणाऱ्या बोडो फुटीरतावाद्यांना संपवण्याचाच विडा केंद्र सरकारने उचलला आहे. बोडो अतिरेक्यांना घेरण्यासाठी लष्कर आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी व्यूहरचना केली असतानाच याकामी शेजारच्या भुतान आणि म्यानमार देशांच्या लष्कराकडूनही भारताने मदतीची मागणी केली आहे.
बोडो प्रदेशाच्या मागणीसाठी बंड पुकारणाऱ्या ‘एनडीएफबी’च्या अतिरेक्यांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्यातील बळींची संख्या ८१ वर पोहोचली आहे. या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध होत असून ‘एनडीएफबी’सारख्या बोडो अतिरेकी गटांना नेस्तनाबूत करण्याची मागणी जोर धरत आहे. या पाश्र्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. आसाममधील विरोधी पक्षांनीही याला पाठिंबा जाहीर केला आहे.
बोडो अतिरेक्यांवर कारवाईसाठी लष्कर, निमलष्करी तसेच स्थानिक सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयातून एक धडक मोहीम राबवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. आसाममधील संवेदनशील भागात लष्कराच्या ६६ तुकडय़ा (४६२० जवान) तैनात करण्यात आल्या असून हवाई टेहळणीही करण्यात येत होती. याशिवाय सशस्त्र सीमा दलाच्या दोन हजार जवानांनाही आसाममध्ये पाचारण करण्यात आले आहे.   लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन परिस्थितीबाबत चर्चा केली. ‘आम्ही आसाममध्ये तीव्र मोहीम हाती घेणार आहोत,’ असे त्यांनी या बैठकीनंतर सांगितले. लष्करप्रमुख शनिवारी राज्याचा दौरा करणार असून त्यात मोहिमेचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनीही शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी कालबद्ध आराखडा आखण्याच्या सूचना केल्या.
लष्करी कारवाई सुरू झाल्यानंतर बोडो अतिरेकी सीमेलगतच्या देशांत पलायन करण्याची शक्यता असल्याने त्या बाजूनेही त्यांची कोंडी करण्याची योजना केंद्राने आखली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भुतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोग्बे यांच्याशी संपर्क साधून तेथील लष्कराच्या मदतीची मागणी केली. भुतानसह म्यानमारनेही भारताला मदत करण्याची तयारी दर्शवल्याचे समजते.

७२ हजार मदत छावणीत
बोडो अतिरेक्यांच्या दहशतीमुळे आसाममधील  चार जिल्ह्यंतील ७२६७५ नागरिकांनी मदत छावण्यांत आश्रय घेतला आहे. यापैकी कोक्राझार जिल्ह्यतच ४० हजार लोक छावण्यांत रहात आहेत.

आसाममधील कोक्राझार, चिरांग, सोनितपूर आणि उदलगुडी या जिल्ह्यांमध्ये लष्कराचे चार हजारहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय सीमा सुरक्षा दलाचे दोन हजार जवान आणि अन्य निमलष्करी दलांच्या तुकडय़ाही परिस्थितीवर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात आहेत.