आसाममध्ये नॅशनल डेमोक्रेटिक फ्रन्ट ऑफ बोडोलँड (एस) या दहशतवादी संघटनेचे तीन अतिरेकी रविवारी दोन चकमकींत ठार झाले. या संघटनेने आसामातील कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्य़ात घडविलेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या ३४वर पोहोचली आहे. अतिरेकी आणखी काही गावांवर हल्ला करण्यासाठी येत असतानाच ही चकमक उडाली आणि अतिरेकी पळून गेल्याने मोठा हल्ला टळल्याचा दावा पोलीस करीत आहेत. रविवारी िहसाचारग्रस्त जिल्ह्य़ात दोन महिलांचे मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या वाढली आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी सहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री तरुण गोगई प्रत्यक्ष भेट देत नाहीत आणि सुरक्षेची हमी देत नाहीत तोवर आपल्या आप्तांचे दफन करणार नाही, अशी भूमिका १८ मृतांच्या कुटुंबियांनी घेतली होती.  आसामचे सहकारमंत्री सिद्दिक अहमद यांनी त्यांचे मन वळविल्यानंतर दफनविधी पार पडला.