आसामच्या तेजपूर येथून २३ मे रोजी बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० या विमानाचे अवशेष काही वेळापूर्वीच सापडले आहेत. ज्याठिकाणी विमानाचा रडारशी संपर्क तुटला होता तेथून जवळच असलेल्या परिसरात विमानाचा सांगाडा सापडला आहे. मात्र, यावेळी विमानात वैमानिक आढळून आले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून या विमानाचा कसून शोध सुरू होता.

हवाई दलाचे सुखोई ३० हे विमान मंगळवारी तेझपूर सलोनीबारी या तळावरून नियमित सरावासाठी झेपावले होते. या विमानात दोन वैमानिक होते. आसाममधील तेजपूरच्या उत्तर भागात असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर हवाई दलाकडून युद्धपातळीवर या विमानाचा शोध सुरू होता. हवाई तळापासून चीनची सीमारेषा जवळ असल्यामुळे हे विमान चीनच्या हद्दीत गेल्याचीही शक्यता होती. मात्र, चीनने आपल्या हद्दीत विमान कोसळल्याचा दावा फेटाळून लावला होता. हरविलेल्या विमानाबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र या विचारणेमुळे चीन संतप्त झाला होता. भारत आणि चीनच्या सीमेबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. दक्षिण तिबेटच्या बाबतीत दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेबाबत भारत सकारात्मक असेल आणि या भागात शांतता आणि सुव्यवस्था राहिल यासाठी प्रयत्न करेल. याशिवाय आता भारताकडून विचारण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टींची उत्तरे आमच्याकडे नाहीत, असे चीनने स्पष्ट केले होते.

बेपत्ता ‘सुखोई’वरुन चीन भडकला; तणाव वाढवत असल्याचा भारतावर आरोप

यापूर्वी १५ मार्च रोजी राजस्थानच्या बारमेरमधील शिवकार कुडाला या गावात सुखोई-३० एमकेआय विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये ३ गावकरी जखमी झाले होते. दोन इंजिन असलेले सुखोई ३० हे विमान रशियामधील सुखोई एव्हीएशन कॉर्पोरेशन या कंपनीने बनविलेले आहे. भारताच्या सुरक्षेमध्ये या विमानाचा मोठा सहभाग आहे. हे विमान सर्व ऋतुंमध्ये सक्षमपणे उड्डाण करु शकत असल्याने ते हवाई दलासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मात्र, गेल्या काही काळातील सुखोई विमानांच्या अपघातामुळे भारतीय हवाईदलाच्या चितेंत भर पडण्याची शक्यता आहे. हवाई दलाच्या ताफ्यातील एकूण सात २४०-सुखोई, सुखोई-३० एमकेआय विमानांचा आतापर्यंत अपघात झाला आहे.

अपघातवार!; राजस्थानात ‘सुखोई’, उत्तर प्रदेशात ‘चेतक’ कोसळले