निवडणूक आयोग पुढील आठवड्यात महाराष्ट्र, हरयाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.
हरयाणा विधानसभेचा कार्यकाळ येत्या २७ ऑक्टोबर तर महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्याचवेळी झारखंड आणि जम्मू काश्मीर या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मात्र २०१५ मध्ये संपणार आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ३ जानेवारी तर जम्मू काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ १९ जानेवारीपर्यंत आहे. त्यामुळे चार राज्यांच्या निवडणुका दोन-दोन असे गट बनवून घेण्याचा विचार आयोग करत असल्याचे कळते. आता येणारी गणेश चतुर्थी, दसरा अणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत. जम्मूत हिवाळा तर झारखंडमध्ये सुरक्षा दलांची तयारी आणि पावसाळ्याचा अंदाज घेऊन निवडणुकीच्या तारखा ठरणार आहेत. निवडणुक आयोगाने या राज्यांमध्ये मतदार याद्यांची तपासणी करण्याचे आदेश अगोदरच देऊन ठेवले आहेत.