नोटाबंदीमुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला असून देशातील ४० लाख कामगारांवर बेकारीची वेळ आली असल्याचा अहवाल उद्योग क्षेत्रात नावाजलेल्या असोचेम या संस्थेनी ठेवला आहे. नोटाबंदीमुळे अनेक छोट्या उद्योगांवर संक्रांत आल्याने त्यांनी कामगारांना कामावरुन हटवले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर बेकारीची वेळ आल्याचे निरीक्षण या अहवालात मांडले आहे. नोटाबंदीमुळे उद्योगांची निर्मिती क्षमता आणि ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्याने उद्योगधंदे मंदावले आहेत.

लघु उद्योग हे प्रामुख्याने रोखीच्या व्यवहारांवरच अवलंबून असतात त्यामुळे बाजारात रोख नसल्याचा सर्वाधिक फटका त्यांना बसला आहे. परिणामी  त्यांच्याकजे असलेल्या कामगारांना काढून टाकण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागल्याचे असोचेमने म्हटले आहे.  नोटाबंदीचा सर्वाधिक फटका कानपूर, आग्रा आणि कोलकाता येथील चर्म उद्योगाला झाल्याचे असोचेमने म्हटले आहे. या ठिकाणी असणाऱ्या चामड्याच्या वस्तूंच्या निर्मितीचा वेग मंदावला असल्याचे असोचेमने केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे.

चामड्यांच्या वस्तू बनविण्यासाठी येणारे चामडे हे खाटिकांकडून येते. त्यांना देण्यासाठी रोख पैसे नसल्यामुळे या लघुउद्योजकांना काही काळासाठी आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला. चेन्नईमध्ये कातडी कमविण्याच्या कारखान्यांमध्ये उत्पादनात ६० टक्के घसरण झाली आहे तर कानपूर, आग्रा आणि कोलकाता येथील कारखान्यांमध्ये ७० टक्के घसरण झाल्याचे उद्योजकांनी म्हटले आहे.

भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष बैज नाथ राय यांनी देखील नोटाबंदीच्या एका महिन्यानंतरच २० लाख मजूर हे बेरोजगार झाल्याचे म्हटले होते.  नोटाबंदीचा सर्वाधिक मोठा फटका हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसल्याचे त्यांनी म्हटले. पंतप्रधान मोदींच्या उद्दिष्टांबद्दल आम्हाला काही संशय नाही परंतु या निर्णयाची अंमलबजावणी नीट झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. अनेक दिवस लोटूनही परिस्थिती सुधारत नसल्याचे त्यांनी म्हटले. या काळात मजुरांना मजुरी मिळत नसल्याचे चित्र आहे असे राय यांनी म्हटले होते.

पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा केली तेव्हा त्यांनी म्हटले होते की यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल परंतु जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी आपले मार्ग शोधून काळा पैसा पांढरा केल्याची अनेक उदाहरणे सापडतील असे राय म्हणाले. ही घोषणा करण्यापूर्वी सरकारने पूर्ण तयारी करायला हवी होती. केवळ जन-धन योजनाच नव्हे तर त्यापेक्षा अधिक बॅंक अकाउंट काढणे अपेक्षित होते. जे लोक मोल मजुरी करतात त्यांच्याजवळ अकाउंट काढायला जाण्यासाठी देखील वेळ नसतो असे ते म्हणाले. त्या लोकांनाही बॅंकेच्या व्यवस्थेमध्ये सामावून घेणे आवश्यक होते, असे राय यांनी म्हटले होते.