१२ डिसेंबर २०१२ म्हणजेच आज १२-१२-१२ अशी तारीख आहे. काही जण अशा प्रकारच्या दिवसाला शुभ मानतात तर काहींच्या मते तो शुभशकुन नाही. त्यामुळेच या दिवशी काय घडणार याबद्दल सर्वाच्याच मनात कुतूहल होते. आज एक मोठी उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून गेली. या उल्केमुळे पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा देण्यात आला होता, त्याप्रमाणे काहीच विपरित घडले नाही. प्लॅनेटरी सोसायटी, इंडियाचे संचालक आणि सचिव एन. रघुनंदन यांनी एक उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असल्याचे म्हटले होते. १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी ५.४ कि.मी. आकाराची ही उल्का पृथ्वीजवळ गेली. प्रति सेकंद ११.९ कि.मी. या वेगाने ती पृथ्वीकडे सरकत होती. या उल्केचा शोध ४ जानेवारी १९८९ रोजी लागला असून तिचे‘तौतातीस’ असे नामकरण करण्यात आले आहे. गेल्या वेळी ही उल्का ९ नोव्हेंबर २००८ रोजी पृथ्वीच्या जवळ आली होती, तर पुढील वेळी ती २९ डिसेंबर २०१६ रोजी पृथ्वीच्या जवळ येणार असून ती तीन कोटी ७५ लाख ७८ हजार ४४२ कि.मी. अंतरावर असेल. २०१६ नंतर ही उल्का २०६९ पर्यंत पृथ्वीच्या जवळ येणार नाही, असेही सोसायटीचे म्हणणे आहे.